

निपाणी : राम मंदिराशेजारी असलेल्या कृषिमित्र चैतन्य शशिकांत नेसरीकर यांच्या घराला गुरुवारी सकाळी अचानक आग लागून अवघ्या पंधरा मिनिटांत संपूर्ण घर बेचिराख झाले. या आगीत दहा तोळे सोने, एक लाख रुपयांची रोकड, दोन फ्रीज, टीव्ही, फर्निचर, धान्य, साखरेची पोती, बी-बियाणे तसेच न्यायालयीन व घरगुती महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील एक भरलेली व एक रिकामी गॅस सिलिंडर टाकी सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चैतन्य नेसरीकर यांचे राम मंदिराशेजारी सर्व्हे क्रमांक ३५२१ मध्ये जुने कौलारू घर आहे. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे यरनाळ येथील शेतात सोयाबीन पीक काढण्यासाठी गेले होते. त्यांची पत्नी, मुलगी व बहीण शिंत्रे कॉलनीतील नातेवाइकांच्या घरी गेल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास नेसरीकर यांच्या घराच्या मागील बाजूने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडू लागले. शेजारील अभय मानवी, प्रणव मानवी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यावसायिकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने नेसरीकर यांना फोनवरून माहिती दिली. तसेच निपाणी अग्निशमन दल आणि हालशुगरच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच निपाणी अग्निशमन दलाचे निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह कर्मचारी जगदीश कांबळे, संजय दळवाई, महेश हळगीमनी, विशाल नाईक व विष्णू तळवार घटनास्थळी दाखल झाले. रमीज कडगी, चंद्रकांत चव्हाण, काशीनाथ चंद्रकुडे, माळाप्पा पुजारी, विशाल जंगटे, अक्षय कमते आणि पत्रकार लियाकत शिरकोळी यांच्यासह नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जुने कौलारू घर असल्याने आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले. अवघ्या पंधरा मिनिटांत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिकांनी घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने बहुतांश साहित्य जळून खाक झाले. यावेळी जवानांनी घरातील दोन गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निपाणी हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला, तलाठी डॉ. अजिज आणि आनंद मडीवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चैतन्य नेसरीकर यांनी फिर्याद दिली असून अग्निशमन दलासह शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
घराला भीषण आग लागून अवघ्या पंधरा मिनिटांत संपूर्ण घर बेचिराख झाले. मात्र, देवघरातील दिवा आणि वीजमीटर असलेली स्टोअर रूम शाबूत राहिल्याने या आगीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले असताना हे दोन्ही भाग सुरक्षित राहिल्याने आगीच्या नेमक्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री उशिरापर्यंत आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
गेल्या आठ दिवसांत निपाणी शहर व परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे १५ एकर ऊस, नगरपालिकेचा गाळा आणि हॉटेल सार्थक गार्डन येथे आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.