

निपाणी ः ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा व महालक्ष्मी मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना असा कार्यक्रम 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारी नगरपालिकेने सुरू केली आहे. मंदिर परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे, शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या शनिवारी (दि. 17) झालेल्या बैठकीत आमदार शशिकला जोल्ले यांनी ग्रामदेवतेची यात्रा व मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना असा भरगच्च कार्यक्रम असल्याने नगरपालिकेने महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकासकामे करावीत, अशा स्पष्ट सूचना पालिका आयुक्त गणपती पाटील यांना दिला होत्या. त्यानुसार निपाणी नगरपालिकेने महालक्ष्मी मंदिरासमोरील गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.
मंदिर परिसरात असलेल्या गटारी उघड्या पडल्या होत्या. तसेच चेंबर नसल्याने भाविकांना अडचण होत होती. आता ही गटार अन्यत्र वळवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येथील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. ही कामे 3 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. याशिवाय स्वच्छतेची कामेही हाती घेण्यात आली आहेत. यात्राकाळात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याची काळजीही घेतली जात आहे.