Nipani Hotel Fire : निपाणीत हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ३५ लाखांचे नुकसान; रोकडही जळाली!

Nipani Hotel Fire : निपाणीत हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ३५ लाखांचे नुकसान; रोकडही जळाली!
Published on: 
Updated on: 

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत दौलतनगर परिसरातील असलेल्या हॉटेल सार्थक पॅराडाईजला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या दुर्घटनेत हॉटेलमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि गल्ल्यातील ४० हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. या आगीत सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, हॉटेल बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उद्योजक केतन बोरगावे यांच्या मालकीचे हे हॉटेल गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास बंद करून ते घरी गेले होते. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष या घटनेकडे गेले.

हॉटेलला आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मालक केतन बोरगावे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे शंकर कोरे यांच्यासह एस. आय. खिचडी, जगदीश कांबळे, दळवाई, विलास नाईक, जगदीश कमते आणि अजित यांनी बंबासह घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीत हॉटेलमधील मोठ्या प्रमाणावर साहित्य भस्मसात झाले होते. फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्रिज, शीतपेयांचा साठा, संगणक तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. याशिवाय कॅश ड्रॉवरमधील सुमारे ४० हजार रुपयांची रोकडही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेमुळे हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सीपीआय बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षक संजीवनी नरसपणावर आणि हवालदार प्रशांत कुदरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी सकाळी हेस्कॉमच्या (HESCOM) निपाणी शहर विभागाचे अभियंता अक्षय चौगुला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा सविस्तर तपशील याबाबत पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news