

निपाणी : शहरातील अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न गेल्या २५ वर्षांपासून अपूर्ण राहिले होते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे ऐतिहासिक कार्य आमदार शशिकला जोल्ले यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्याद्वारे केले असल्याचे पत्रक माजी नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आमदार जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पट्टणकुडी क्षेत्रामध्ये निपाणी शहरासाठी 1812 घरांना मंजुरी मिळाली. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेकडो बेघर व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या 1812 घरांपैकी पहिल्या टप्प्यात पूर्णत्वास आलेली 600 घरे बुधवारी लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. घरांचे वाटप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून, ज्या लाभार्थ्यांनी सर्वप्रथम नियमानुसार संपूर्ण रक्कम जमा केली आहे, त्यांना त्याच अनुक्रमांकानुसार घरे देण्यात येतील.
दि.17 मार्च रोजी आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी नगरपालिका आयुक्त तसेच लाभार्थी यांच्यासमवेत बैठक घेतली होती. त्या वेळी 532 लाभार्थ्यांनी संपूर्ण रक्कम भरली होती. त्यानंतर आमदारांनी उर्वरित बेघर व वंचित लाभार्थ्यांना लवकरात लवकर रक्कम भरण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आजपर्यंत एकूण 948 लाभार्थ्यांनी संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यामुळे प्रथम रक्कम भरलेल्या पहिल्या 600 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात घरे वितरित करण्यात येतील. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात तयार होणारी घरे त्याच पारदर्शक निकषांनुसार देण्यात येतील.
या प्रक्रियेमध्ये आमदार जोल्ले यांनी कोणताही पक्षपात किंवा हस्तक्षेप केलेला नाही. पात्रतेनुसार आणि रक्कम भरल्याच्या क्रमानेच घरांचे वाटप होत आहे. मात्र, काही व्यक्ती या जनहिताच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जयवंत भाटले, राजेंद्र गुंदेशा, विजय टवळे, सुनील पाटील अभिनंदन मुदकुडे, विनोद बागडे, रवी कदम, रवी इंगवले,संतोष सांगावकर, महेश सूर्यवंशी, सागर मिरजे, राजेश कोठडीया, दत्ता जोत्रे, जुबेर बागवानउदय नाईक, दीपक पाटील, सद्दाम नगार्जी यांनी केले आहे.
घरकुल निर्मितीमुळे वर्षानुवर्षे हक्काच्या निवाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचे स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे बुधवारी घरकुले देण्यासंदर्भात होणाऱ्या बैठकीला ज्यांना नोटीस मिळाली आहे, अशा लाभार्थ्यांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार तथा आश्रय कमिटी अध्यक्षा शशिकला जोल्ले यांनी केले आहे.