Nipani News: महामार्गाच्या कामाचा दर्जा तपासणार कोण?

निपाणीजवळ पुलाच्या भिंतीला भगदाड; दर्जेदार काम करण्याची मागणी
Nipani News: महामार्गाच्या कामाचा दर्जा तपासणार कोण?
Published on
Updated on
राजेश शेडगे

निपाणी : निपाणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम एस. एम. अवताडे कंत्राटदाराकडून वेगाने सुरू आहे. परंतु गडबडीत ही कामे उरकून घेत असताना निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बुधवार, दिनांक २९ रोजी महात्मा गांधी रुग्णालयाजवळ या रस्त्याच्या पुलाच्या भिंतीला भगदाड पडले. ही घटना पावसामुळे घडल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात येत असले तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हे भगदाड पडले असून, गटारीवर घालण्यात आलेले स्लॅबदेखील आता कोसळू लागले आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा तपासणारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणा आहे कोठे, असा सवाल निपाणीकर नागरिकांतून विचारला जात आहे.

येथील महात्मा गांधी रुग्णालयासमोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेली भिंत कोसळल्याने कामातील गलथानपणा व निकृष्ट दर्जा पुन्हा स्पष्ट झाला. या भिंतीसाठी वापरण्यात येणारे इंटरलॉकिंग पेवर ब्लॉक एकावर एक रचून आत मध्ये मातीचा थर घालून ही भिंत बांधली जात आहे. या रस्त्यावरून अद्याप वाहतूक सुरु नसताना ही भिंत कोसळल्याने वाहनधारकातून भीती व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाची देखभाल करणारे अभियंता व संबंधित ३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे झालेल्या रस्ते कामाचा दर्जा यापुढे कोण पाहणार असा सवाल निर्माण झाला असून झालेले काम दर्जेदार कशावरून झाले, असे कसे म्हणता येईल ? अशी शंका आता सर्व स्तरात घेतली जात आहे. एकूणच राष्ट्रीय महामार्गाच्या निष्कृष्ट कामासह तेथील समस्यांमुळे येथील प्रवास धोकादायक बनल्याची भावना निर्माण झाली आहे. कामातील दोष तपासून आताच हा रस्ता दर्जेदार होणे गरजेचे आहे.

वास्तविक केंद्र शासनाने होनगा ते कोगनोळी महाराष्ट्र हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सहा पदरीकरण कामासाठी २८६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यामध्ये संकेश्वर ते कोगनोळी या कामाचे ६९.१७ किलोमीटर टेंडर एस एम अवताडे कंपनीला दिले आहेत. या रस्ते कामाची मुदत ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत आहे. त्यामुळेच घाई गडबडीत ही कामे उरकली जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरल्याने हे भगदाड पडल्याचे सांगितले जाते. परंतु अद्याप यावरून कोणतीही वाहतूक सुरू झालेली नाही. आता ही परिस्थिती तर अवजड वाहने या रस्त्यावरून सुरू झाल्यावर हा रस्ता वाहनांच्या भाराला सहन करणारा आहे का? हे तपासणारी यंत्रणा कोठे आहे असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. यापूर्वीही तवंदी घाटात मुसळधार पावसामुळे सारे पाणी रस्त्यावरून वाहत होते. तेथेही कंपनीने पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था केली नव्हती. गटार कामासाठी तर निकृष्ट दर्जाचे स्टील फायबर युक्त सळ्या वापरण्यात आले आहेत. त्यामुळे गटारी ढासळू लागले आहेत. भिंतीसाठी ज्या विटा वापरले आहेत त्यांची अडक करण्यात आलेली नाही.

यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी मुरगूड रोडवरील उड्डाणपुलाची भिंत अशाच पध्दतीने कोसळली होती. त्यावेळी रस्ते निर्मिती प्रशासनाकडे विचारणा केल्यावर ट्रकच्या धक्क्याने भिंत कोसळली असाल्याचे सांगण्यात आले; मात्र ट्रकच्या धक्क्याने भिंत कोसळत असेल तर त्याचा दर्जा काय असाही प्रश्न उपस्थित होतो.

विशेष म्हणजे या दोन्ही घटनेवेळी बाजूच्या सेवा रस्त्यावरून वाहने किंवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गांधी रुग्णालयाजवळील भिंत कोसळली त्यावेळी बाजूच्या सेवा रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती,पण भिंत कोसळल्यावर येथील वाहतूक ठप्प झाली. आधीच सहापदरीकरणाचे काम लांबल्याने वाहनधारक, नागरिक हैराण झाले आहेत. अशातच निकृष्ट आणि दोषपूर्ण काम निदर्शनास आले आहे. यामुळे आता संबंधितावर कारवाई होणार का, अशी विचारणा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news