

निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भोंब पौर्णिमेनिमित्त भरणारी पाचदिवसीय यात्रा २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी श्रींची पालखी व सबिना सोहळा होणार असून, रात्री ढोलजागराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर रोजी रात्री ढोलजागरानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा होईल. २८ ऑक्टोबर रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा होणार असून, उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक होणार आहे.
२९ ऑक्टोबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून, दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा आणि उत्तररात्री मुख्य दुसरी भाकणूक होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक होईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे. दरवर्षी भरणाऱ्या नाथांच्या भोंब पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते. नाथांचे निस्सीम भक्त भगवान डोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांच्याकडून भाकणूक केली जाते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक उपस्थित राहतात.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीला सुरुवात झाली असल्याची माहिती आप्पाचीवाडी यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी जाधव व ग्रामस्थांनी दिली. यात्रेदरम्यान पाच दिवस शाळेच्या आवारात हालसिद्धनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रेत सहभागी होणाऱ्या विविध दुकानदारांना जागा देण्याचे काम २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यात्राकाळात सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे भाविकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी आणि संकेश्वर येथून जादा बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.