

मधुकर पाटील
निपाणी : अन्न भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेले प्रशासन सुस्तच आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृती करण्यासह कार्यवाही करण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचेही दुर्लक्ष दिसत आहे. यामध्ये संबंधित खात्याकडून जुजबी कारवाई व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीवघेण्या भेसळीचे पदार्थ खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे या दिवाळी सणात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निपाणीसह खेड्यापाड्यातील लहान-मोठी हॉटेल, खानावळी, चहाच्या टपऱ्या, वडापाव सेंटर, किराणा दुकानात कडधान्य, तेल, तूप, मसाले, मिठाई, दूध दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ वाढत आहे. खाण्यापिण्यासाठी मनुष्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी करण्याची जवाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची असते. शहरातील जबाबदारी नगरपालिका तर उर्वरीत ग्रामीण भागातील जबाबदारी शासनाचा सबंधित विभाग पार पाडतो. या खात्याअंतर्गत विविध ठिकाणची दुकाने, हॉटेल्स ठिकाणी अन्न पदार्थाचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्याची जबाबदारी असते. तपासातील दोषी आढळणाऱ्यांवर काही दिवसांसाठी परवाना रद्द, खटले आदी नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. पण ठरलेले उद्दिष्ट पूर्ण करीत अधिकारीही गपगुमान तर भेसळ करणारे निर्धास्त असल्याचे दिसत आहे.
महिन्याला नमुना तपासणी व एक-दोन दिवसांसाठी परवाना रद्दचा खेळ झाल्यावर भेसळ करणारे व रोखणारेही निर्धास्त असतात. संपूर्ण तालुक्यासाठी आरोग्याची काळजी घेणारे अधिकारी केवळ एकच अन्न निरीक्षक आहे. पण ते सुध्दा फिरतीच्या नावाखाली गायबच असतात. निपाणी शहरात या विभागाचे स्वतंत्र कार्यालय नावालाच आहे. त्यामुळे नगरपालिका विभाग वगळता चिकोडी अथवा बेळगाव येथून येणारे अधिकारी आपल्या सवडीने कारवाई करतात. सध्या सर्वत्रच मोठमोठ्या हॉटेल्सपासून किराणा दुकानापर्यंत भेसळ करणाऱ्यांना भीतीच राहिलेली नाही. अन्न भेसळीचा खटला फौजदारीत मोडतो. पण दररोजच्या कामातून आपले व शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास विषय संपला, अशी या विभागाच्या कामाची पध्दत आहे.