

निपाणी : रासाई शेंडुर येथे अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यामध्ये दोन दुभत्या म्हैशीसह एका रेडकाचा होरपळून मृत्यू झाला. तर यावेळी लागलेल्या आगीत गोठ्यातील शेती औजारेही जळून खाक झाल्याने सुमारे ३ लाखाचे नुकसान झाले. दरम्यान या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रासाई शेंडुर येथील रहिवासी प्रियांका चंद्रकांत माने यांचा गावंदरी शेतवडीत जनावरांचा गोठा आहे. दरम्यान सोमवारी (दि. ९) मध्यरात्री दोनच्या सुमारास या गोठयाला अचानकपणे आग लागली. ही घटना शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची माहिती माने यांना दिली. त्यानुसार घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र तत्पूर्वीच लागलेल्या या आगीत दोन म्हशीचा होरपळून मृत्यू झाला. तर एक रेडकू गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्याचाही मंगळवारी (दि. १०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी ग्रामतलाठी आनंद मडीवाळ, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, बीट हवलदार शिवायगोळ, पशु वैद्याधिकारी ए. टी. माने यांनी भेट देऊन रितसर पंचनामा केला. माने यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांची शेती तुटपुंजी असून जनावरांच्या पैदासीवरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे शासनाने या कुटुंबाला योग्य ती मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी,प्रशासनाने ही आग लावली की लागली या सर्व बाबीचा तपास अनेक शक्यतेवर चालवला आहे.