Nipani water crisis: निपाणीत पिण्याच्या पाण्याची टंचाई

अनेक कूपनलिका नादुरुस्त; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Nipani water crisis: निपाणीत पिण्याच्या पाण्याची टंचाई
Published on
Updated on

निपाणी : शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. जवाहरलाल तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पाऊस न झाल्याने जून महिना उलटला तरी तलावातील पाण्याची पातळी वाढलेली नाही. मंगळवारी तलावात फक्त ३० फूट २ इंच इतका पाणीसाठा होता. शहर व उपनगराला पालिकेकडून आठवड्यातून एक वेळ पाणीपुरवठा कमी दाबाने केला जात आहे. पाणीपुरवठ्यात सुधारणा करा या मागणीसाठी आम्ही निपाणीकर संघटनेतर्फे बुधवारी सायंकाळी ४ वाजता नामदेव मंदिर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान शहरात अनेक ठिकाणी असलेल्या कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बंद पडलेल्या कुपनलिका दुरुस्त करून सुरू कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. मंगळवारी चिमगावकर गल्ली येथील नागरिकांनी पालिकेत येऊन पाणीटंचाई विषयी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

शहरातील लोणार गल्ली व कोरवी गल्ली ल पाणीपुरवठा करणारी कूपनलिका बंद पडली आहे. किरकोळ रिपेरी असली तरी ही रिपेरिंग करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे लोणार गल्ली कोरवी गल्ली व जिजामाता चौक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. निळारी गल्ली येथील बंद पडलेल्या कूपनलिका मोटारीची दुरुस्ती झाली असली तरी त्याचे बिल न दिल्याने या कूपनलिकेमध्ये अध्याप मोटार बसवण्यात आलेली नाही त्यामुळे ही गल्ली पाण्यापासून वंचित राहिले आहे. चिमगावकर गल्ली, कोकरे गल्ली येथील कूपनलिका बंद आहेत त्या दुरुस्त करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

गांधी चौक येथील कुपनलिकेचा कॉक फुटला आहे. त्यामुळे सुतार गल्लीला पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. मानवी गल्ली येथील पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे कूपनलिकेचे पाणी मिळत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. जोशी गल्ली मर्गुबाई मंदिराजवळील कुपनलिका गेल्या काही वर्षापासून बंदच आहे. ट्रकने धडक दिल्याने या कूपनलिकेमध्ये पडलेली मोटार काढून पुन्हा री बोर करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सटवाई रोड व आझाद गल्ली येथील कुपनलिका बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. जवाहरलाल तलावाचे नळाद्वारे येणारे पाणी आठ दिवसातून एक वेळ कमी दाबाने येत असल्याने नागरिकांनी पाणी कसे व कोठे भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाईचा गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रशासनाने पुढे येण्याची गरज आहे.

निपाणी पालिकेवर जिल्हाधिकारी हे प्रशासक आहेत. परंतु गेल्या आठ नऊ महिन्यात त्यांनी एकदाही निपाणी पालिकेला भेट दिलेली नाही. पालिका आयुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच पालिकेचा कारभार सुरू आहे. सध्या वेद गंगेला आलेल्या पाण्यामुळे पाणी उपसा करून फिल्टर करून शहर व उपनगराला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपलब्ध पाणी कपात करून नागरिकांना देण्याची योजना असल्याची माहिती विशाल लाटवडे यांनी दिली. शहरात ९७ कूपनलिका सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शिरगुपी येथील तलावाचे पाणी वापरात घेण्याविषयी सूचना करण्यात आली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिली. मंगळवारी दुपारी शहरात तुरळक पावसाच्या सरी झाल्या त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला असला तरी पाणीटंचाई हटवण्यासाठी मोठ्या पावसाची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news