

निपाणी : बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीतील दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस टू घरांचे वाटप करण्यासाठी बुधवारी सकाळी आश्रय योजना समितीने लाभार्थ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आ. शशिकला जोल्ले यांनी प्रथम चार हप्ते भरलेल्या ६०० लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने घरे देण्यात येतील, असे स्पष्ट केले. याला बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी विरोध दर्शविला.
९४८ लाभार्थ्यांनी पैसे भरले असल्याने सर्वांची लॉटरी काढण्यात यावी, अशी मागणी केली. आमदार जोल्ले यांनी ८०० घर तयार आहेत. त्यामुळे ८०० लाभार्थ्यांची लॉटरी काढून घर देण्याची तयारी दर्शवली. यालाही विरोध झाला. यावेळी भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी सदर बैठक रद्द केल्याची घोषणा केली.
घर मिळणार म्हणून अनेक लाभार्थी आपल्या कुटुंबातील लहान मोठ्या सदस्यांसह उपस्थित होते. परंतु प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत त्यांच्या पदरात घराच्या चाव्या पडल्या नाहीत. आ. जोल्ले यांनी आपण कोणताही पक्षपात व जातीयवादाचे राजकारण केलेले नाही. सर्व बेघरांना घरे दिली जातील. परंतु, प्रथम चार हप्ते भरलेल्यांना प्राधान्य देण्याची घोषणा केली. अशी योजना काँग्रेसने का मंजूर करून आणली नाही, असा सवाल केला. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध करून सर्व ९४८ जणांना घरे देण्याची मागणी केली.
आ. जोल्ले म्हणाल्या, या योजनेमध्ये १०८ एससी एसटी लोकांना घरे देण्यात येणार होती. परंतु प्रत्यक्षात २०३ जणांना घरे देण्यात आली आहेत. अजूनही घरापासून वंचित असणाऱ्यांना घरे देण्यात येणार आहेत. डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आपण आमदार झालो आहोत. त्यामुळे आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. शिवाय जोल्ले ग्रुप यासाठी १ कोटी रुपये खर्च करणार आहे.
लक्ष्मण चिंगळे म्हणाले, निपाणीच्या विकासासाठी ज्या त्या वेळच्या आमदारांनी योगदान दिले आहे. काळम्मावाडी करार केला म्हणून पाण्याची समस्या मिटली आहे. निपाणी मतदारसंघ वाचवण्याचे काम माजी आ. काकासाहेब पाटील यांनी केले आहे. म्हणून आपण आमदार झाला आहात. काँग्रेस सरकार हमी योजनांद्वारे निपाणी मतदारसंघातील ६५ हजार महिलांना २००० रुपये देत आहे. यादी बनवण्यामध्ये अधिकार्यांनी गलथान कारभार केला आहे.
आ. जोल्ले यांनी यात आपली काय चूक आहे हे दाखवून द्यावे, असे अधिकाऱ्यांना सांगितले. सर्व महिलांनी पुढे येऊन आम्हाला घरे मिळाली पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. ही सभा रद्द झाल्याने आमदार जोल्ले यांनी व्यासपीठावरून जाणे पसंत केले. पुढे मंडपात जाऊन थांबल्यावर पोलिसांनी बंदोबस्तात चिंगळे यांना व्यासपीठावरून नेले. यावेळीही संतप्त महिलांनी घोषणाबाजी केली. टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील व्यासपीठावर जाऊन बसल्यानंतर माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनीही खुर्ची पटकावली होती. परंतु दोन्ही बाजूनी घोषणाबाजी झाल्याने दोघांनाही खाली जाणे भाग पडले. जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व चिंगळे यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्येही कोणताही तोडगा निघाला नाही.
यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी मार्गदर्शन केले. सर्वांना घरे मिळतील. परंतु संयम राखला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी पालिका आयुक्त गणपती पाटील, योजना निर्देशक मल्लिकार्जुन कलादगी यांचीही उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे, भाजप अध्यक्ष राजू गुंदेशा यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.