Nipani Crime : निपाणीत सराफ दुकान फोडले; अवघ्या ३२ मिनिटांत ३५ लाखांची चांदी लंपास

सीसीटीव्हीवर स्प्रे मारून शटर कापले; निपाणीत सराफ संघटनेच्या अध्यक्षांचेच दुकान लुटले
Nipani Crime : निपाणीत सराफ दुकान फोडले; अवघ्या ३२ मिनिटांत ३५ लाखांची चांदी लंपास
Published on: 
Updated on: 

निपाणी : शहराच्या मध्यवर्ती भागातील चन्नम्मा सर्कलसमोरील तुषार बिल्डिंगमध्ये असलेले ‘श्री ज्वेलर्स’ हे सराफी दुकान चोरट्यांनी पहाटे अवघ्या अर्ध्या तासात फोडले. दुकानातील सुमारे ३५ लाख रुपये किमतीचे १३ किलो चांदीचे दागिने व वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. विशेष म्हणजे, चोरट्यांनी आतील लॉकरला हात न लावल्याने त्यातील सोन्याचे दागिने व रोकड सुरक्षित राहिली. ऐन दसऱ्याच्या तोंडावर शहराच्या मुख्य बाजारपेठेत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे दुकान सराफ संघटनेचे अध्यक्ष विलास गणपतराव माळी (हुपरीकर) यांच्या मालकीचे आहे. प्राथमिक माहितीनुसार, चार चोरटे लाल रंगाच्या कारमधून आले होते. त्यांनी सुरुवातीला दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून तो निकामी केला. त्यानंतर कटरच्या साहाय्याने शटरचे कुलूप व पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. पहाटे ३.५८ ते ४.३० या अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी चोरी करून पोबारा केला.

चोरीची पद्धत आणि हालचाली पाहता यामागे सराईत इराणी टोळीचा हात असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर सर्व शक्यता पडताळून तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माळी यांचे हे दुकान या ठिकाणी सुरू आहे. रविवारी नेहमीप्रमाणे व्यवहार आटोपून ते रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानाची पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक गंगाराम पुजेरी, सहायक उपनिरीक्षक संजीवनी नरसपन्नावर यांच्यासह एलसीबी पथकातील शेखर असोदे, एम. ए. तेरदाळ व राजू दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बेळगाव येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने अशोकनगर मुख्य रस्त्यावरून माग काढत पीटर इंग्लंड शोरूमसमोरील चौकापर्यंत धाव घेतली; मात्र तेथे काही वेळ घुटमळल्यानंतर श्वान माघारी फिरले.

परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता तोंडाला मास्क बांधलेले चार संशयित लाल रंगाच्या कारमधून आल्याचे समोर आले आहे. दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेले सुमारे १३ किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास झाल्याचे माळी यांनी फिर्यादीत नमूद केले असून, सीपीआय बी. एस. तळवार पुढील तपास करत आहेत.

अवघ्या ३२ मिनिटांत ‘एन्ट्री टू एक्झिट’!

चोरट्यांनी पहाटे ३.५८ वाजता दुकानात प्रवेश केला आणि ४.३० वाजता मुद्देमालासह कारमधून पलायन केले; म्हणजेच अवघ्या ३२ मिनिटांत ही संपूर्ण धाडसी मोहीम फत्ते करण्यात आली. त्यांनी केवळ शोकेसमधील १३ किलो चांदीचे दागिने लक्ष्य केले. लॉकर, कॅश ड्रॉवर किंवा इतर मौल्यवान वस्तूंना त्यांनी स्पर्शही केला नाही. या कार्यपद्धतीवरून (मोडस ऑपरेंडी) ही इराणी टोळी असण्याची दाट शक्यता असून पोलीस त्या दिशेने कसून शोध घेत आहेत.

'चोर सोडून संन्याशाला...' पोलिसांकडून मालकावरच प्रश्नांची सरबत्ती

दुकानातून तब्बल ३५ लाखांची चांदी चोरीला गेल्याने आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या विलास माळी यांच्यावरच पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘दुकानात सायरन का बसवला नाही?’, ‘असलेला सायरन वेळेवर दुरुस्त का केला नाही?’ असे सवाल पोलिसांनी विचारले. त्यावर सायरन नादुरुस्त असल्याचे माळी यांनी सांगितले. त्याचवेळी चोरी गेलेल्या ऐवजाची तातडीने मोजदाद करण्यासाठीही पोलिसांकडून घाई केली जात होती. त्यामुळे "चोरटे चांदी घेऊन पसार झाले अन् पोलीस मात्र मालकालाच जाब विचारत आहेत," अशी नाराजी घटनास्थळी उपस्थित नागरिकांमधून व्यक्त होत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news