Nipani Crime : सौंदलग्यात १० बंद घरे फोडली; मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्याचा प्रयत्न फसला, शेंगदाणे खाऊनच काढला पळ

Nipani Crime : सौंदलग्यात १० बंद घरे फोडली; मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्याचा प्रयत्न फसला, शेंगदाणे खाऊनच काढला पळ
Published on
Updated on

निपाणी : सौंदलगा गावातील शिंदे गल्ली, गलगले गल्ली आणि परिसरातील सुमारे दहा बंद घरांची कुलपे फोडून एका भुरट्या चोरट्याने धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, घरांमध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू हाती न लागल्याने चोराचा हा डाव पूर्णपणे फसला. अखेर घरातील डब्यात सापडलेल्या शेंगदाण्यांवर अन् खाद्यपदार्थांवर ताव मारून चोरट्याने तेथून पळ काढला. या अजब चोरीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून, हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घरांतील कुटुंबीय पंढरपूर वारीच्या पायी दिंडीत सहभागी झाले होते. घरे बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने रात्रीच्या वेळी एकामागोमाग एक घरांची कुलपे तोडली. घरात प्रवेश करून कपाटे, तिजोऱ्या आणि इतर सामानाची उचकापाचक केली. दोन घरांच्या तिजोऱ्यांची कुलपेही तोडण्यात आली; मात्र, अपेक्षेप्रमाणे दागिने किंवा रोख रक्कम न सापडल्याने चोरट्याची मोठी निराशा झाली.

या गडबडीत घरातील कपडे व साहित्य विस्कटून टाकण्यात आले. स्वयंपाकघरातील डबे उघडूनही चाचपणी करण्यात आली, परंतु काहीच हाती न लागल्याने शेवटी एका डब्यातील शेंगदाणे आणि काही खाद्यपदार्थ खाऊन चोरट्याने तिथून पलायन केले.

दुसऱ्या दिवशी वारीवरून परतलेल्या घरमालकांना घरांची कुलपे तुटलेली व सामान अस्ताव्यस्त आढळले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिथे गर्दी केली. ऐनवेळी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकरणी निपाणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news