

निपाणी : कर्नाटक सरकारच्या ‘अन्नभाग्य योजने’अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना वितरित करण्यात येणारा रेशनचा तांदूळ गुजरातमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई केली. कोगनोळी गावच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ सोमवारी मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत ६० टन तांदूळ आणि दोन ट्रक असा सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही ट्रकचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महंमद रफीक मकतूमसाब अत्तार (वय ५२, रा. सुभाषनगर, हुबळी) आणि रतन बबन सदानंदे (वय २०, रा. अर्जुनसोंडा, जि. लातूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
अन्नभाग्य योजनेतील तांदूळ बेकायदेशीररीत्या गुजरातकडे नेला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने कोगनोळी टोलनाक्याजवळ सापळा रचला. यावेळी केए ६३ ए ०३१३ क्रमांकाचा ट्रक अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये ५० किलो वजनाची ६०२ पोती आढळून आली. त्यात सुमारे ३० टन तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले. ट्रकचालक महंमद रफीक अत्तार याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याच्या मागोमाग आणखी एक ट्रक असाच तांदूळ घेऊन येत असल्याची माहिती त्याने दिली.
त्यानंतर पथकाने एमएच ०९ ईएल ७०६० क्रमांकाचा दुसरा ट्रक अडवून तपासणी केली. या ट्रकमध्येही ५० किलो वजनाची ६०० पोती (सुमारे ३० टन तांदूळ) आढळून आली. अशा प्रकारे दोन्ही ट्रकमधून एकूण ६० टन तांदूळ जप्त करण्यात आला.
याप्रकरणी तालुका अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वतीने आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निपाणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईत सीपीआय बी. एस. तळवार, ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, साहाय्यक उपनिरीक्षक ए. बी. बजंत्री, हवालदार सलीम मुल्ला, मंजुनाथ कल्याणी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्राथमिक तपासात हा तांदूळ रेशनवर वितरित होणारा ‘अन्नभाग्य योजने’तील असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा तांदूळ हुबळी परिसरातून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेला जात होता. दरम्यान, हा तांदूळ नेमका कोणाकडून खरेदी करण्यात आला होता आणि गुजरातमध्ये कोणाला विकला जाणार होता, याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती तालुका आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली.