

निपाणी : येथील प्रसिद्ध हॉटेल हरिप्रियाचे मालक तथा व्यावसायिक हर्ष आनंद शेट्टी (वय ५०, रा. बुदलमुख-पांगिर रोड,निपाणी) यांची बॉक्साईट मटेरियल व्यवसायाच्या नावाखाली तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेळगाव व रत्नागिरी येथील तिघांविरोधात बेळगावच्या टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष शेट्टी यांची अमृता गोविंद सूर्यवंशी (रा. महालक्ष्मी नगर, नवी गल्ली, पहिला क्रॉस, गणेशपूर, बेळगाव) तसेच रत्नागिरी येथील जे. पी. शिपिंग अँड ट्रेडिंग कंपनीचे मालक जितेश डी. यादव आणि प्रवीण यादव यांच्याशी ओळख झाली होती. संबंधितांनी शेट्टी यांना बॉक्साईट मटेरियलचा संयुक्त व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव देत त्यांचा विश्वास संपादन केला. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळेल, असे सांगून संशयितांनी ३ ऑक्टोबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत टप्प्याटप्प्याने शेट्टी यांच्याकडून एकूण ५१ लाख रुपये स्वीकारले. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नाही. तसेच, शेट्टी यांना ना नफा मिळाला, ना त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम परत करण्यात आली.
याबाबत शेट्टी यांनी अनेक वेळा संबंधितांकडे पैशांची मागणी केली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अधिकृत फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, आर्थिक व्यवहारासंदर्भातील करारपत्र बेळगाव येथे करण्यात आले होते. त्याआधारे टिळकवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणूक आणि विश्वासघातासंदर्भातील कलम ४०६ व ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सीपीआय परशराम पुजारी करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून निपाणी शहरात यशस्वी हॉटेल व्यवसाय करणाऱ्या हर्ष शेट्टी यांच्यासारख्या अनुभवी व्यावसायिकाची व्यवसायाच्या आमिषाने एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॉक्साईट मटेरियल व्यवसायासाठी संबंधितांना ५१ लाख रुपयांची रक्कम दिली होती. मात्र, त्यानंतर व्यवसाय सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. पैसे परत करण्याची वारंवार मागणी करूनही संबंधितांनी दुर्लक्ष केले. आर्थिक व्यवहाराचे करारपत्र बेळगाव येथे झाले होते. त्यामुळे आपण टिळकवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
– हर्ष शेट्टी, फिर्यादी व हॉटेल व्यावसायिक, निपाणी