

निपाणी : तवंदी घाटातील हॉटेल व्हाईट हाऊसनजीक शनिवारी दुपारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. स्क्रॅप व्यावसायिकांच्या बैठकीत किरकोळ वादातून एकाने अचानक गोळी झाडली. मात्र समोरील व्यक्तीने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या तपासासाठी कोल्हापूर व इचलकरंजी परिसरात पोलिस पथक रवाना झाले आहे. या अचानक झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तवंदी घाटात हॉटेल व्हाईट हाऊसनजीक स्क्रॅप व्यावसायिकांची बैठक सुरू होती. यावेळी काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली.रागाच्या भरात एकाने अचानक पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने समोरील व्यक्तीने गोळी चुकवल्याने तो थोडक्यात बचावला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस. तळवार व सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत.
गोळीबार करणाऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपाlसासाठी गेलेल्या पथकाच्या माहितीच्या आधारे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.