Nipani Accident : स्पीड ब्रेकरवरून आदळली कार; विद्युत खांबाला धडक, लाखांचे नुकसान

सोलापूर येथील नवदाम्पत्यासह पुण्यातील कारचालक बचावला; निपाणीजवळ अपघात
Nipani Accident : स्पीड ब्रेकरवरून आदळली कार; विद्युत खांबाला धडक, लाखांचे नुकसान
Published on
Updated on

निपाणी : चालकाला स्पीड ब्रेकर न दिसल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला कारची जोरात धडक बसली. यावेळी विद्युत खांब कारवर कोसळल्याने गोवा पर्यटनासाठी जात असलेल्या सोलापूर येथील नवदाम्पत्यासह पुणे येथील कारचालक असे तिघेजण आश्चर्यकारकरित्या बचावले. दरम्यान, या अपघातामुळे कारचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा अपघात निपाणी-अकोळ मार्गावर लखनापूर बसस्थानकाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला. या घटनेमुळे विद्युत खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे येथील रहिवासी व 'आराध्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स'चे कार मालक व चालक आप्पासाहेब (किंवा आपासाहेब) जाधव हे भाड्याने सोलापूर येथील नवदाम्पत्याला (नाव समजू शकले नाही) गोवा येथे फिरावयास घेऊन जात होते. दरम्यान, त्यांची कार अकोळ-निपाणी मार्गावर लखनापूर बसस्थानकाजवळ आली. यावेळी रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर नसल्याने चालक जाधव यांना स्पीड ब्रेकर दिसले नाही. त्यामुळे भरधाव कारची रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला जोराची धडक बसली.

ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसताच विद्युत खांब कारवर कोसळला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचालकासह नवदाम्पत्याला धीर देत कारमधून बाहेर काढले. निपाणी-अकोळ हा मार्ग आंतरराज्य असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, पहाटेची वेळ असल्याने या काळात वाहतूक कमी होती; त्यामुळे मोठा धोका टळला. कारमधील नवदाम्पत्यासह चालक जाधव हे सुदैवाने या घटनेतून सुखरूप बचावले.

दरम्यान, विद्युत खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित राहिला होता. निपाणी 'हेस्कॉम'च्या (HESCOM) अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कोसळलेला खांब नव्याने उभा केला व वीजपुरवठा सुरळीत करून दिला. अपघातस्थळी नागरिक तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती.

logo
Pudhari News
pudhari.news