

निपाणी : पुढारी वृत्तसेवा महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेचे प्राण ॲम्बुलन्सची वाट न पाहता निपाणी बस आगाराचे चालक गोविंद बडीगेर याने दाखवलेल्या तत्परतेमुळे वाचले.निपाणी बस आगाराच्या चालकाने धावती बस थांबवून जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले.या माणुसकीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चालकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोनाबाई रामचंद्र कंकणवाडी (वय ६५, रा.कणगला ता. हुक्केरी ) असे जखमी वृद्धेचे नाव आहे.रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार महामार्गावरील तीस नंबर बिडी कारखान्याजवळ, चव्हाण मळा परिसरात घडला. विशेष म्हणजे सदर बस चालकाने सदर वृद्धेची सोन्याच्या दागिन्याची बसमध्ये विसरलेली पर्सही प्रामाणिकपणे लागलीच तिच्या नातेवाईकाकडे परत केली.
सोनाबाई यांना संधिवाताचा त्रास असल्याने त्यांचा मुलगा सदाशिव कंकणवाडी त्यांना दुचाकीवरून उपचारासाठी निपाणी येथे घेऊन येत होता. दरम्यान, सर्व्हिस रस्त्यावरून महामार्गावर येताना अचानक सोनाबाई यांचा तोल गेला आणि त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्या रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याचवेळी बेळगावहून निपाणीकडे येणारी बस घटनास्थळी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बस चालक गोविंद बडीगेर यांनी क्षणाचाही विलंब न करता बस थांबवली.वाहकाच्या मदतीने तसेच जखमींच्या मुलाच्या सहाय्याने सोनाबाई यांना काळजीपूर्वक बसमध्ये घेतले आणि थेट निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवले. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योग्यवेळी मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान,या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बस चालकाने दाखवलेली तत्परता,धाडस आणि माणुसकीचे दर्शन याचे सर्वत्र कौतुक होत आहे.संकटाच्या क्षणी मदतीचा हात देणारी ही कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चालकाचा असाही प्रामाणिकपणा. ..
निपाणी आगाराचे बस चालक गोविंद बडीगेर यांनी सदर जखमी वृद्धेला बसमध्ये तातडीने घेत सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवलेच.मात्र यावेळी गडबडीत सदर वृद्धेच्या हातातील पिशवीमध्ये लहानशा पर्समध्ये सोन्याचे दागिने होते. जखमी वृद्धा सोनाबाई यांना उपचारासाठी दाखल करून बसमध्ये आल्यानंतर चालक बडीगेर यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने सदर ऐवजाची पिशवी सोनाबाई यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकाकडे सुपूर्द करीत आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला.