

निपाणी : कोडणी येथे एका दूध डेअरीत काम करणाऱ्या कामगाराची दुचाकी चोरून त्याच दुचाकीवरून गावोगावी रात्री-अपरात्री फेरफटका मारीत तब्बल 16 दुचाकी चोरणाऱ्या माणकापूर (ता. निपाणी) येथील व कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या नागेश तानाजी केंगारे (वय 26) या कामगाराला ग्रामीण पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. त्याने चोरलेल्या 8 लाख रुपये किंमतीच्या 16 दुचाकी जप्त केल्या. केवळ 20 दिवसात या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावल्याबद्दल जि. पो. प्रमुख के. रामराजन यांनी ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
कोडणी येथील दूध डेअरी कामगार अजित कौलवकर 15 मार्चरोजी हालशुगर कारखाना स्थळावर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी दुचाकी पार्क करून गेला होता. प्रदर्शन पाहून आल्यानंतर मूळ ठिकाणी दुचाकी सापडली नाही. त्यांनी चोरीची फिर्याद ग्रामीण पोलिसात दिली होती. डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी एलसीबी पथकाचे हवलदार एम.एफ.नदाफ, रामगोंडा पाटील, रघु मेलगडे, सलीम मुल्ला,मंजुनाथ कल्याणी, परमानंद मारूशेठ,विनोद असोदे यांच्या मदतीने तपास सुरु केला.
निपाणी-मुरगुड मार्गावर गायकवाडीजवळ नागेश चोरलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याचे दिसून आले. त्याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इचलकरंजी, शहापूर, कोडणी, रेंदाळ व निपाणी परिसरातील गावांतून 16 दुचाकी चोरून त्या यळगुड येथील एका गॅरेज चालकाच्या सहाय्याने मॉडीफाय करून विकण्यासाठी आडी गावाबाहेर ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या 16 दुचाकी जप्त केल्या आहेत.
18 महिन्यांत चोरल्या : 20 दिवसात सापडल्या
नागेश केंगारे शिफ्टनुसार कागल एमआयडीसीमध्ये कारखान्यात काम करीत होता. शिफ्ट नसेल त्यावेळेत तो गावोगावी फिरून गेल्या 18 महिन्यांपासून दुचाकी चोरत होता. पोलिसांनी अवघ्या 20 दिवसांत त्याला ताब्यात घेऊन सुमारे 16 दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या दुचाकी जप्त केल्याची माहिती मिळताच दुचाकी मालकांनी पोलिस स्थानकाला भेट देऊन खातरजमा करण्यासाठी गर्दी केली होती.