

निपाणी : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे तीन वर्षांपासून काम सुरू असून, बुधवारी निपाणी शहरातून गेलेल्या पट्ट्यातील महामार्गाची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा उघड झाला असून, मुख्य मार्गावरून रहदारी सुरू होण्याआधीच हा प्रकार घडला आहे. रहदारी सुरू असती तर काय घडले असते, हा प्रश्न असून, तूर्त आधीप्रमाणेच सेवा रस्त्यावरून बेळगाव-कोल्हापूर वाहतूक सुरू आहे.
सहा पदरीकरणाचे काम एस. एम. अवताडे कंपनीकडून सुरू आहे. बुधवारी छत्रपती शिवाजी उद्यानासमोरून गेलेल्या रस्त्याची रिटेनिंग वॉल म्हणजेच संरक्षक भिंत कोसळली. अद्याप या रस्त्यावरून वाहतूक सुरू झालेली नाही. मात्र, पावसाळा सुरू होताच ही परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. घटनास्थळी आमदार शशिकला जोल्ले यांनी भेट देऊन या घटनेची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कळवणार असल्याचे सांगितले.
अरोरा गारमेंटपासून खरी कॉर्नर व पुढे शिरगुपी रोडपर्यंत रस्त्याची भिंत सिमेंट ब्लॉकच्या पद्धतीने उभारली आहे. मात्र, इंटरलॉकिंग न करता एकावर एक थर रचून आतील बाजूस प्लास्टिकची जाळी अंथरूण त्यावर माती पसरली जात होती. महात्मा गांधी रुग्णालयाच्या भुयारी मार्गाच्या पुढील बाजूची ब्लॉकची भिंत पूर्णपणे ढासळली. मोठ्या प्रमाणात माती आणि तुटलेले सिमेंट ब्लॉक रस्त्यावर पडले. वरच्या बाजूचा स्लॅबही मधोमध वाकला आहे. भिंतीच्या आत घातलेली प्लास्टिकची जाळी उघडी पडली आहे. इंटरलॉकिंग नसल्याने व पावसाच्या दाबामुळे ही संरक्षक भिंत कोसळून पडल्याचे मानले जाते. भिंत सर्व्हिस रोडवरून होत असलेल्या वाहतुकीवर कोसळली असती, तर अनर्थ घडला असता.
महामार्गावर महात्मा गांधी रुग्णालयाजवळ तसेच खरी कॉर्नर व शिरगुपी रोड येथे भुयारी मार्ग करण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरून रहदारी सुरू झाल्यावर रस्ता टिकणार का, असा सवाल वाहनधारक करत आहेत. कंपनीचे अधिकारी दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी बंदोबस्त ठेवला होता. सहा पदरीकरणासाठी केंद्र शासनाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तरीही काम निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्यात यावे, अशीही मागणी होऊ लागली आहे.