

फोटो: बालेचाॅंद मुल्ला
निपाणी; पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर वंटमुरी घाट येथे अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रिक्षा मेकॅनिकल बालेचाॅंद नजीर मुल्ला (वय ४१) रा.भीमनगर,निपाणी हे जागीच ठार झाले.हा अपघात शनिवारी दुपारी झाला.घटनेची नोंद काकती पोलिसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील प्रसिद्ध रिक्षा मेकॅनिकल बालेचाॅंद मुल्ला हे नेहमीप्रमाणे बेळगाव येथे दुचाकीवरून रिक्षाचे स्पेअर पार्ट आणण्यासाठी जात होते.दरम्यान त्यांची दुचाकी वंटमुरी घाटात आली असता मागून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,अज्ञात वाहनाच्या धडकेनंतर बालेचाॅंद हे जोराने खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते जागीच ठार झाले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळतात काकती पोलीस ठाण्याचे सीपीआय सुरेश शिंगे यांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात वाहनाचा शोध चालवित मयत व्यक्तीची ओळख पटवीत त्यांच्या कुटुंबियांना पाचारण केले.त्यानुसार घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयासह निपाणीतील सामाजिक कार्यकर्ते रत्नशास्त्री ए.एच.मोतीवाला यांच्यासह रियाज मुल्ला,इफजुल जमादार,रशीद मुल्ला,प्रवीण सुतार यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
यावेळी बालेचाॅंद यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी केलेला आक्रोश हृदय पिळवटुन टाकणारा होता.मयत बालेचाॅंद मुल्ला हे निपाणी परिसरात रिक्षा मेकॅनिकल म्हणून परिचित होते.त्यांचा या व्यवसायात मोठा हातखंडा होता.त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,वडील,भाऊ असा परिवार आहे.दरम्यान बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर निपाणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक तसेच त्यांच्या मित्र परिवारासह मेकॅनिकल व्यावसायिक बांधव उपस्थित होते.
दरम्यान मयत बालेचाॅंद यांचा मुलगा हसन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिसांनी हिट अँण्ड रन या कायद्याने गुन्हा दाखल करून पुढील तपास चालवला आहे.