

मधुकर पाटील
निपाणी : कुटुंबासाठी नव्या घराची उभारणी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुलीसोबत गेलेल्या पित्याचा प्रवास नियतीने अर्ध्यावरच संपवला. घराचा आराखडा घेऊन परतताना तवंदी घाटात काळाने बाप-लेकीवर घाला घातला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने निपाणी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार पुंडलिक रुद्रापा हट्टी (वय ५३) आणि त्यांची मुलगी निकिता पुंडलिक हट्टी (वय २३, दोघेही रा. ऊळागडी, खानापूर ता. हुक्केरी) यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास हॉटेल व्हाईट हाऊसनजीक हा भीषण अपघात घडला. धडकेनंतर कंटेनरने दुचाकीला सुमारे २०० फूट फरफटत नेले. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे निपाणी परिसरासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
हवालदार पुंडलिक हट्टी हे गेल्या तीन वर्षांपासून निपाणी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्य बजावतानाच कुटुंबाच्या भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या हट्टी यांनी मूळ गावी नवीन घर बांधण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी आवश्यक आराखडा आणण्याकरिता ते बुधवारी मुलगी निकिता हिला सोबत घेऊन हुक्केरी येथे गेले होते. निकिता ही हैदराबाद येथे यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेत होती. वडिलांसोबत घराच्या कामासाठी गेलेल्या निकिताला काय माहीत, की हा प्रवास तिच्या आयुष्यातील अखेरचा ठरेल! हुक्केरी येथील काम पूर्ण करून दोघेही दुचाकीवरून निपाणीकडे परतत होते. रात्री आठच्या सुमारास तवंदी घाटातील हॉटेल व्हाईट हाऊसनजीक बंगळूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका भीषण होता की, कंटेनरने दुचाकीला सुमारे २०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातातील दृश्य अत्यंत विदारक होते. एका क्षणात बाप-लेकीची साथ कायमची तुटली आणि हट्टी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगापा पुजेरी, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हवालदार पुंडलिक हट्टी आणि निकिता यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक, पोलीस अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि मित्रपरिवाराने सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात गर्दी केली. दोघांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज गुरुवारी त्यांच्यावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि वडील असा परिवार आहे.
प्रत्येक कुटुंबाप्रमाणे पुंडलिक हट्टी यांचेही स्वतःच्या घराचे स्वप्न होते. कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा, या उद्देशाने त्यांनी नवीन घर बांधण्याचे नियोजन केले होते. याच घराचा आराखडा आणण्यासाठी ते मुलगी निकिता हिला सोबत घेऊन हुक्केरीला गेले होते. घराच्या स्वप्नाला आकार देऊन आनंदाने संसार फुलविण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, आराखडा घेऊन परततानाच तवंदी घाटात काळाने घाला घातला. ज्या नव्या घरात कुटुंबासोबत सुखाचे क्षण घालविण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली, त्या स्वप्नांना नियतीने कायमचा पूर्णविराम दिला. घर उभारण्याची तयारी सुरू असतानाच बाप-लेकीच्या निधनाने हट्टी कुटुंबाचा आधार हरपला.आता त्या नव्या घरात राहण्याऐवजी कुटुंबीयांच्या मनात त्यांच्या आठवणींचेच घर कायमचे उभे राहिले आहे.