

निपाणी : चित्रदुर्ग–कलबुर्गी मार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात यरनाळ (ता. निपाणी) येथील चालक राकेश अर्जुन ऐवाळे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपायुक्त वैष्णवी पाटील यांच्या कारला हा अपघात झाला. या घटनेमुळे यरनाळ गावावर शोककळा पसरली आहे.
मयत राकेश ऐवाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णवी पाटील यांच्या कारवर चालक म्हणून कार्यरत होते. चार दिवसांपूर्वी ते उपायुक्त पाटील यांच्या कुटुंबीयांसमवेत देवदर्शनासाठी चित्रदुर्ग परिसरात गेले होते. देवदर्शन आटोपून परत येत असताना चित्रदुर्ग–कलबुर्गी मार्गावर रविवारी सकाळी त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात राकेश ऐवाळे यांचा जागीच मृत्यू झाला.
राकेश ऐवाळे हे अत्यंत मनमिळाऊ, हळवे आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व होते. मित्रपरिवार व नातेवाइकांत त्यांचा मोठा गोतावळा होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन जुळी मुले, आई-वडील तसेच दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांचे वडील अर्जुन ऐवाळे हे सेवानिवृत्त शिक्षक असून एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. राकेशच्या जाण्याने ऐवाळे कुटुंबाचे घर पोरके झाले आहे.