

निपाणी : निपाणी-चिकोडी मार्गावर शुक्रवारी सायंकाळी दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. सुभाष शंकर खोत (वय 41, रा. नाईंग्लज (ता. चिकोडी) हे जागीच ठार झाले. दुचाकीवर मागे बसलेल्या महिला अनिता पनासे (वय 28, रा. शिरगाव, ता. चिकोडी) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद खडकलाट पोलिसांत झाली आहे.
सुभाष व त्यांच्या नातेवाईक महिला अनिता पनासे हे निपाणी येथून दुचाकीवरून आपल्या मूळगावी जात होते. दरम्यान चिकोडी मार्गावर त्यांची दुचाकी दाईंगडे मळ्याच्या वळणावर आली असता चिकोडीकडे निघालेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात सुभाष खोत हे खाली कोसळल्याने जागीच ठार झाले तर अनिता या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार यांच्यासह उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी पाहणी करून ट्रकचालकाविरेधात गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे.