Belgaum crime: बारा गुन्हेगारांना पाच वर्षे शिक्षा

न्यू वंटमुरीतील विवस्त्र धिंड प्रकरण : राज्यभर गाजलेल्या प्रकरणाचा जलदगतीने निकाल
Belgaum crime
Belgaum crimePudhari
Published on
Updated on

बेळगाव : प्रेम प्रकरणातून तरुण-तरुणी पळून गेल्याने तरुणाच्या आईची विवस्त्र धिंड काढत तिला खांबाला बांधून मारहाण करणाऱ्या न्यू वंटमुरीच्या 12 जणांना बुधवारी न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास ठोठावला आहे. दहाव्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी हा निकाल देताना आर्थिक दंडही केला आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये सहा महिलाही आहेत.

शिक्षा जाहीर होताच गुन्हेगारांना व त्यांच्या नातेवाईकांना रडू कोसळले. तर निकालाचे सामाजिक संघटना व महिला संघटनांनी स्वागत केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये घडलेले हे प्रकरण राज्यभर गाजले होते. प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, त्याच्यावर बाल गुन्हेगार न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तोही निकाल लवकरच लागणार आहे.

बसाप्पा रूद्राप्पा नाईक (वय 45), राजू रूद्राप्पा नाईक (वय 52), केंप्पाण्णा रूद्राप्पा नाईक (वय 32), पार्वती बसाप्पा नाईक (वय 37), यल्लव्वा रूद्राप्पा नाईक (वय 67), लक्काप्पा राजू नाईक (वय 26), गंगव्वा बसाप्पा वालीकर (वय 62), संगीता सदाशिव हेग्गनाईक (वय 35), संतोष बसाप्पा नाईक (वय 21), शोभा राजाप्पा ऊर्फ राजू नाईक (वय 49), लक्कव्वा यल्लाप्पा नाईक (वय 42) व शिवाप्पा रायाप्पा वन्नुरी (वय 53, सर्वजण रा. न्यू वंटमुरी) अशी शिक्षा झालेल्या 12 जणांची नावे आहेत.

डिसेंबर 2023 मध्ये आरोपी बसाप्पाची मुलगी गावातीलच एका तरुणासोबत पळून गेली होती. त्यामुळे चिडलेल्या बसाप्पाने, ‌‘तुझ्या मुलासोबतच माझी मुलगी पळून गेली आहे आणि त्याला तुझी फूस आहे‌’, असे म्हणत 11 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास सदर महिलेला घरातून ओढत बाहेर आणून जबर मारहाण करत तिचे मंगळसूत्र तोडून टाकले. तिला विवस्त्र करून विजेच्या खांबाला बांधून घातले. तिला जबर मारहाण करत विनयभंग केला. यामध्ये सदर महिला गंभीर जखमी झाली होती. यामध्ये इतर 11 जणांनी त्याला साथ दिली होती.

प्रकरण राज्यभर

विवस्त्र धिंड प्रकरण घडले, तेव्हा बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू होते. शिवाय या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिवेशनात चर्चेला आले. यानंतर काकती पोलिसांत विविध कलमांतर्गत तसेच पीडित महिला मागासवर्गीय असल्याने अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालीही गुन्हा नोंदवूून नोंद करून घेत तपास सुरू केला.

उच्च न्यायालयाकडून दखल

प्रकरण राज्यभर गाजू लागल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणी सुओ-मोटो तक्रार दाखल करून तातडीने प्रकरणाची चौकशी करून आरोपपत्र दाखल करावे, असे न्यायालयाने पोलिस खात्याला सुनावले होते.

सीआयडीकडून तपास

प्रकरणाचा तपास राज्य पातळीवरून सुरू झाला. गृहखात्याने या प्रकरणाचा तपास 16 डिसेंबर 2023 पासून सीआयडीकडे सोपवला. सीआयडीने तपास हाती घेत 22 एप्रिल 2024 रोजी 133 दिवसांत आरोपपत्र सादर केले. 92 साक्षीदार, 37 मुद्देमालांची तपासणी करून जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या आत निकाल दिला. विशेष सरकारी वकील एल. एस. सुळ्ळद यांनी पीडितेची बाजू मांडली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास

उच्च न्यायालयाने घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर सीआयडीच्या तत्कालीन डीजी आणि आयजीपीच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. सीआयडीचे तत्कालीन पोलीस प्रमुख पृथ्वीक शंकर यांनी तपास केला. त्यांना सहायक म्हणून सीआयडीच्या तत्कालीन उपअधीक्षक अंजुमला, पोलीस निरीक्षक नारायणी यांनी सहकार्य केले.

आरोपी, नातेवाईकांना अश्रू अनावर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणात आरोपींना काय शिक्षा होणार, याची उत्सुकता होती. 12 आरोपींचे नातेवाईक न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोपींना पाच वर्षाची शिक्षेचा आदेश होताच आरोपींसह नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू आले. महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news