

बेळगाव : छत्रपती शिवरायांना शहाजीराजांकडूनच स्वराज्य स्थापनेचा मंत्र मिळाला होता. शिवरायांनी वापरलेली संस्कृत राजमुद्रा शहाजीराजांनी लिहून दिली होती. शहाजीराजे यांनी शिवरायांना बंगळूरला बोलावून युद्धाचे प्रशिक्षण दिले होते. होदेगिरी येथील शहाजी राजांची समाधी पुन्हा रखरखते आहे. त्याच्याकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे. औरंगजेबाच्या बापाला हरवलेल्या शहाजीराजे यांचा इतिहास अभ्यासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित सहाव्या अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
सर्वप्रथम पानिपत शब्द कसा कळला यावर ते म्हणाले, पाचवीत पानिपत धडा शिकवत असताना मी दांडी मारली. शिक्षकांनी प्रश्न विचारला, पण चुकीचे उत्तर दिल्याने मार बसला. यानंतर चोरून पुस्तके वाचनाची आवड निर्माण झाली. 1988 मध्ये पानिपतचे गुर्हाळ पहिल्यांदा मांडले. त्यानंतर आयुष्यभर शब्दांच्या फडात रमत गेलो. महाराष्ट्र हा ध्येयासाठी वेडा झालेला प्रांत आहे. दिल्लीच्या गादीचे संरक्षण करणारे पेशवे, शिंदे, होळकर गेले. तिथे लाखावर मराठे गारद झाले. पण मराठ्यांनी इतिहासात शौर्य गाजवले.
कला व शब्द घेऊन जे लोक पुढे जातात, तेच विश्वाला आकार देतात. नवलेखकांनी दबून न जाता भव्यदिव्य लिहिण्याची गरज आहे. तीस वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा कोणत्या कार्यक्रमात दिसत नव्हती. छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांविषयी नवविचार सुरू झाला आहे. 1685 मध्ये मुंबई गव्हर्नरकडे होती. त्यावेळी संभाजी महाराजांनी मुंबई विकत घेण्याचा करार केला होता. पण हा करार यशस्वी झाला नाही. जंजिरा किल्ल्यावर शिवरायांनी पाच वेळा आक्रमण केले. पण यश आले नाही. संभाजी महाराजांनी समुद्रात पाषाण ठेवून सेतू बांधला. छावा चित्रपटात दाखवलेली बुर्हाणपूरची लढाई झाली नव्हती. ती लूट होती, असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांविषयी औरंगजेबाने इतका धसका घेतला होता की दरबार भरून त्याने राजमुकुट जमिनीवर फेकून त्यांना मारण्याची शपथ घेतली होती.
शहाजहानच्या पत्नीचा चौदाव्या बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शहाजहान यांनी आग्रा येथे ताजमहल बांधण्याचा निर्णय घेतला. ताजमहल पूर्ण झाल्याशिवाय बाहेर कुठेही न जाण्याचा चंग बांधला. मात्र दक्षिणेत शहाजीराजांचे प्रस्थ वाढल्याने त्यांना दक्षिण स्वारी करावी लागली. देशातील 11 संस्कृत पंडितापैकी शहाजीराजे एक होते. छत्रपती शिवरायांच्या लग्नाला शहाजीराजे यांना यायला जमले नाही. त्यानंतर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना बंगळूरला बोलावून घेतले. तिथे त्यांनी युद्धाचे प्रशिक्षण दिले. खवळलेल्या हत्तीवर कसे स्वार व्हायचे, रणात कसे लढायचे हे शहाजीराजे यांनी शिवरायांना शिकवले.
नवलेखकांना कष्टाशिवाय पर्याय नाही. उत्तम कादंबरीकार होण्यासाठी शिल्पकाराप्रमाणे काम करावे लागते. जोपर्यंत मूर्तीला आकार, उकार मिळत नाही, तोपर्यंत कलाकृती सजवायची असते, असे सांगून त्यांनी जपानमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी असलेला आदर कथन केला. साफल्यपूर्ण जीवन कसे जगायचे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकावे तर जीवन कसे अर्पण करायचे हे संभाजी महाराजाकडून शिकावे, असे सांगितले.
ब्रिटिश काळातील नकाशावर शहाजी रोड, शहाजी मार्ग अशी नावे होती. पण सध्या शहाजीराजे यांचा इतिहास अपेक्षेप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. कर्नाटकात साडेतीनशे वर्षापासून त्यांची समाधी उन्हात रखरखत आहे. त्या समाधीला सीमाभागातील जनतेने भेट देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.