Naib Subedar Ramchandra Patil: नायब सुभेदार रामचंद्र पाटील अमर रहे !

कर्लेत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार : पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित : लष्कराकडून मानवंदना
Naib Subedar Ramchandra Patil: नायब सुभेदार रामचंद्र पाटील अमर रहे !
Published on
Updated on

किणये : अपघातात मुत्युमुखी पडलेले कर्ले येथील नायब सुभेदार रामचंद्र पाटील यांच्यावर रविवारी (दि.३) दुपारी १२ वाजता हजारोंच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्ले पंचक्रोशीतील हजारो नागरिक, गावकरी, विद्यार्थी, युवक उपस्थित होते. अश्रू भरल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील मनोहर पाटील यांनी अग्नी दिला. नायब सुभेदार रामचंद्र पाटील यांचा गावाकडे येत असताना शनिवारी (दि. २) अपघात झाला. यामध्ये ते मुत्युमुखी पडले. ही माहिती कुटुंबीय, गावकरी यांना समजताच सारेजण दु:खसागरात बुडाले होते. शनिवारी रात्री मृतदेह बेळगावात मराठा लाईट इन्फ्रंट्रीत आणण्यात आला. सकाळी गावच्या पंचांकडे आणि कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विनायक पाटील, मनोहर सांबरेकर, जोतिबा गडकरी, दिलीप पाटील आदीसह गावकरी उपस्थित होते.

लष्कराच्या वाहनांतून मृतदेह सकाळी ८ वाजता कर्ले गावाकडे नेण्यात आला. कर्ले क्रॉसवर गावकऱ्यांनी गर्दी केली होती. त्याठिकाणी ट्र्रॅक्टर ट्रॉली सजवून बहाद्दरवाडीमार्गे कर्लेला मृतदेह नेण्यात आला. ठिकठिकाणी पुष्पहार घालून मृताला आदरांजली वाहण्यात आली. गावात मृतदेह आल्यानंतर घरी नेण्यात आला. त्यावेळी पत्नी, आई व कुटुबियांनी एकच आकांत केला. तेथून मृतदेह प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणात नेण्यात आला. त्याठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आला.

तेथून मृतदेह गल्लीतून स्मशानभूमीकडे नेण्यात आला. यावेळी भारत माता की जय, मृत जवान अमर रहे, अशा घोषणा देण्यात येत होत्या. गावात रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे फलक उभारण्यात आले होते. स्मशानभूमीत लष्करातर्फे तीन फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी अभिवादन केले. कर्ले गावाला सैनिकांची परंपरा आहे. गावातील तीन जवानांनी लष्करी सेवेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. रामचंद्र पाटील यांचा अपघात परिसरावर आघात करणारा असल्याचे त्‍यांनी सांगितले.

युवा नेते मृणाल हेब्बाळकर, बहाद्दरवाडी गावकऱ्यांतर्फे मल्लाप्पा पाटील, मच्छे येथे निवृत कॅप्टन विठ्ठल बेळगावकर, येळ्ळूर येथील राजू पाटील, चांगदेव देसाई, जानेवाडी येथील वैजू गोजेकर, नावगे येथील गणपत मोटणकर, विश्वनाथ पाटील, जिल्हा सैनिक बोर्डाचे जोतिबा गडकरी, कावळेवाडी येथील गोपाळ जाधव, किणये येथील अनिल पाटील, शिवाजी पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news