बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून करण्यात येत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही सीमावासीयांसोबत आहोत. या अन्यायाबाबत संसदेत आवाज उठवणार असून मराठी लोकांच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म. ए. युवा समितीला पाठविले आहे.
म. ए. युवा समितीने खासदार लंके यांना सीमाभागातील मराठी भाषिकांवर बेकायदा कन्नडसक्ती लादून कर्नाटक सरकार अन्याय करत आहे. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या तरतुदी आणि उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवण्यात येत आहे. याविषयी संसदेत आवाज उठवण्याची मागणी करणारे पत्र पाठविले होते. त्या पत्राला खासदार लंके यांनी उत्तर दिले आहे. शिवाय युवा समितीच्या पदाधिकार्यांशी फोनवरही संवाद साधला आहे.
भाषावार प्रांतरचनेच्यावेळी सीमाभागातील 865 गावे कर्नाटकात घालण्यात आली. तेव्हापासून तेथील मराठी माणूस मराठी भाषा, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा स्थितीतही कर्नाटकाकडून सीमाभागात लोकांच्या मर्जीविरोधात कन्नडसक्ती करण्यात येत आहे.
केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसींचे पालन
होत नाही. त्यामुळे, सीमाभागातील मराठी भाषिकांना आमचा पाठिंबा आहे. भाषा, संस्कृती आणि सन्मानाचा हा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळला जावा, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठीसाठी आयोजित मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. हा विषय आपण संसदेत उपस्थित करु, अशी ग्वाही खासदार लंके यांनी दिली आहे.