

बेळगाव : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या व चैनीखोर बनलेल्या आपल्या मुलाच्या खुनाची सुपारी आईने प्रियकराला देऊन खून घडवून आणला आहे. त्याबद्दल आईसह तिचा प्रियकर आणि त्याचे पाच मित्र अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. हे सहाही जण गडहिंग्लज तालुक्यातील तेरणीचे रहिवाशी असून, आई बंगळूरची आहे. १ नोव्हेंबरला हा खून बेळगावजवळच करून युवकाचा मृतदेह केएलईजवळ महामार्गाच्या शेजारी झुडुपात फेकण्यात आला होता. आधी अनोळखी मृतदेही सापडल्याची नोंद माळमारुती पोलिसांनी केली होती. त्यानंतर आठच दिवसांत खुनाचा छडा लावण्यात यश आले आहे.
विजय नारायण (वय २४, रा. आरटीनगर बंगळूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये राकेश परशुराम जामुनी (वय ३४, भीमनगर तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), श्रीमती मीना नारायण (वय ४४, रा. आरटीनगर, बंगळूर), सचिन मल्लाप्पा कांबळे (वय ३४, रा. कवळीकट्टी, रोड तेरणी), मनोज दुंपाप्पा कांबळे (रा. भीमनगर, तेरणी), तम्माण्णा रविंद्र कांबळे (वय २१, रा. कवळीकट्टी रोड, तेरणी), एकनाथ उमाप्पा कांबळे (वय ३२, रा. भीमनगर, तेरणी) यांच्यासह एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ नोव्हेंबररोजी केएलई छत्रीजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. माळमारुती पोलिसानी संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू होता. तरुणाची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असताना दोन दिवसांनी मृताची आई श्रीमती मीना व तिचा प्रियकर राकेश हे दोघेजण खडेबाजार पोलीस ठाण्यात गेले. मीना यांनी आपला मुलगा २८ ऑक्टोबररोजी बंगळूरहून बेळगावला राज्योत्सव पाहण्यासाठी आला होता आणि तेव्हापासून बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. सरदार मैदानाजवळून तो बेपत्ता असल्याचे तिचे म्हणणे होते. तिला जेव्हा सदर अनोळखी मृतदेह दाखवला तेव्हा तिने हा मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे कबूल केले.
तपासात खून उघड
मृतची ओळख पटल्यानंतर माळमारुती निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी हाती घेतली. तो बंगळूरहून कोणासोबत आला, याची माहिती घेतली असता मीना हिनेच तो राकेश जामुनी याच्यासोबत कारमधून आल्याचे सांगितले. त्यानंतर राकेशची चौकशी करताना पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळला
राकेशने दिलेल्या कबुली जबाबात मीना हिने सांगितल्यानुसारच आपण हा खून केल्याचे म्हटले केले. २८ ऑक्टोबररोजी विजयला बंगळूरहून बेळगावला राज्योत्सव पाहण्यासाठी म्हणून घेऊन आलो. बेळगावजवळ आल्यानंतर महामार्गावर हायवेवर त्याला मद्यातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्याला झोप येऊ लागल्यानंतर कार काकतीजवळून जंगल भागात नेली. विजय हा चालकाच्या बाजूला पुढच्या आसनावर बसलेला होता. पाठीमागे बसलेल्यांनी नशेचा व झोपेचा अंमल असलेल्या विजयचा नायलॉनच्या काथ्याने गळा आवळला. तो मृत झाल्याचे लक्षात येताच केएलई छत्रीजवळ जाऊन मृतदेह रस्त्यावर फेकून सर्वजण गडहिंग्लजला निघून गेले.
चैनी, अनैतिक संबंधाला अडसर
मीनाच्या पतीचे वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे ती व मुलगा विजय दोघेच राहत होते. पतीची व मीनाच्या वडिलांची मालमत्ताही तिच्याकडेच असल्याने दरमहा त्यांना बंगळूर येथे ७० ते ८० हजार रूपये भाडे येते. दोन बंगले शिवाय अन्य मालमत्ता असल्याने मुलालाही दारूचे व्यसन लागल्याचे मीनाचे म्हणणे आहे. तो दारू पिऊन आपल्याला त्रास देत होता. शिवाय मृत विजयला आई व राकेशच्या अनैतिक संबंधाची कुणकूण लागल्याने यावरूनही तो आईशी भांडण काढत होता. त्यामुळे मीनानेच राकेशला बेळगावला नेऊन विजयला मारून टाक असे सुचवल्याचे तपासात समोर आले आहे.
गावचे सहकारी खुनात फसले
राकेश बंगळूरला राहातो. त्याच्या तेरणी गावात शेजारी राहणाऱ्या मित्रांना त्याने बंगळूरला चैनीसाठी म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी बंगळुरात चार दिवस चैनी केली. त्यानंतर कारमधून बेळगावकडे येताना त्याने याबाबत मित्रांना सांगितले. यानंतर नशेत असलेल्या सर्वांनी विजयचा खून केला. चैनीसाठी मित्राकडे गेलेले सर्वच साथीदार या खून प्रकरणात गोवले गेले आहेत.