

बेळगाव ः सहा वर्षांपूर्वी हातउसने व्याजाने घेतलेली रक्कम देत नसल्याच्या कारणातून माय-लेकीने मृत महिलेच्या घरी जाऊन धक्काबुक्की केल्यानंतर डोके किचन कट्ट्यावर आदळल्याने मृत्यू झाला. परंतु, ही चोरीची घटना असल्याचे भासवत दिशाभूल करणार्या माय-लेकीसह 16 वर्षांच्या मुलाला कॅम्प पोलिसांनी अटक केली.
अंजना अजित दड्डीकर (वय 54, रा. गणेशपूर) या महिलेचा 21 रोजी रात्री मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ज्योती नितीन बांदेकर (वय 46) तिची मुलगी सुहानी नितीन बांदेकर (वय 19, दोघीही रा. विजयनगर) व अल्पवयीन मुलगा अशा तिघांना अटक केली.
गणेशपूर येथे महिलेचा खून झाल्याची घटना सोमवारी 21 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली होती. सायंकाळी पती घरी आल्यानंतर त्यांनी पत्नी स्वयंपाक घरात निपचित पडलेली पाहिली. यानंतर नातेवाईकांना बोलावून घेतले व हॉस्पिटलला नेल्यानंतर डॉक्टरांनी त्या मृत पावल्याचे जाहीर केले.
याप्रकरणी मृताची मुलगी अक्षता सूरज पाटील यांनी कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी याची नोंद करून घेत तपास सुरू केला होता.
अंजना दड्डीकर यांनी उपरोक्त संशयित महिलेकडून 2019 मध्ये 15 हजार हातउसने घेतले होते. त्या रकमेपोटी त्या व्याज व रक्कमही देत होत्या. परंतु, संपूर्ण रक्कम हवी, असे म्हणत ज्योती बांदेकर या अंजना यांच्याशी सातत्याने भांडण काढत होत्या. खुनाच्या दिवशी ती, तिची मुलगी अंजना यांच्या घरी गेल्या. यावेळी त्यांच्यामध्ये भांडण झाले व रागाच्या भरात त्यांनी अंजना यांना किचनमध्ये जाऊन धक्काबुक्की केली. यावेळी अंजना यांचा तोल जाऊन त्या किचनमध्येच पडल्या.
त्या निपचित पडल्यानंतर माय-लेकी घाबरल्या. त्यामुळे भितीपोटी त्यांनी नवीनच शक्कल लढवली. जाताना त्यांनी महिलेच्या गळ्यातील, कानातील तसेच अंगावरील 1 लाख 70 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने काढून नेले. चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न माय-लेकींनी केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या घराबाहेर पडल्यानंतर मुलाने त्यांना दुचाकीवरून नेले. त्यामुळे या तिघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता माय-लेकीची कारागृहात तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.