

बेळगाव : मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. पाण्याचा निचरा न झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सखल भागात पाणी जमा झाल्याने तळघरात व्यवसाय थाटलेल्या ठिकाणी पाणी शिरले. विजेचे खांब आणि झाडाच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
शहरात ठीकठिकाणी पाणी साचल्याने त्यातूनच दुचाकी व चारचाकी चालकांना वाहने चालवावी लागली. बीम्सजवळ झाडाची फांदी पडल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. हिंडाल्को जवळ झाड वीजतारांवर पडल्याने तीन वीज खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे केळकरबागला जाणारा सर्व्हिस रोड बंद ठेवावा लागला. शहरात पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मंगळवारी दुपारी साडेचारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावत सुमारे दीड तास झोडपले. सोसाट्याचा वारा सुटल्याने कौलारू घरांसह आरसीसी इमारतींवरीलही पाणी शिरले. सखल भागात गटारीच्या पाण्याचा निचरा न झाल्याने केळकरबाग येथे दगड पडल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले.
खानापूर-बेळगाव रोड, काँग्रेस रोड, एपीएमसी रोड, महाद्वार रोड, रविवार पेठ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडे कोणतेही साधन नसल्याने त्यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करणारे भाजीपाला विक्रेते, किरकोळ साहित्य विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पडल्याने कौलारू घरात गळती लागली. येडियुरप्पा मार्गावर घालण्यात आलेल्या मंडपाचे नुकसान झाल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे ट्रॅफिक जामचा अनुभव वाहनचालकांना आला. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी छतावरच थांबून राहिल्याने ते पाणी काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे नागरिकांना फटका सहन करावा लागला.