

बेळगाव : 'यंदा मान्सून लांबणार', 'पाऊस उशिरा येणार' अशा सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर मान्सून पावसाने शनिवारी (दि. ६) सायंकाळी बेळगाव परिसरात हजेरी लावली. पावसाच्या रिमझिम सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मृग नक्षत्र सोमवारपासून (दि. ८) सुरू होणार असून, या पावसामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लोक असह्य उकाड्याने त्रस्त होते. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर गर्द काळ्या ढगांची दाटी दिसत असल्याने पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. दुपारी तीनच्या सुमारास बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली.
सायंकाळी पाचच्या सुमाराला शहर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे शहर, उपनगरांतील काही भागातील सखल रस्त्यावर पाणी साचले होते. या पहिल्याच पावसाने वाहनधारकांची तारांबळ उडाली. घराबाहेर पडताना रेनकोट व छत्रीचा वापर करण्यात आला. सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता.
या पावसामुळे मान्सून सक्रिय झाल्यासारखे वातावरण असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी बियाणे खरेदी केलेल्या शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा होती. धूळवाफ पेरणी केलेल्या भातपिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला असून, आता पेरणीच्या हंगामाची लगबग वाढणार आहे.