बंगळूर, रायचूर, कारवार जिल्ह्यांत आज मॉक ड्रिल

देशातील 244 जिल्ह्यांचा समावेश; मेगायुद्ध सज्जतेची देशवासीयांची चाचणी
Mock drill
बंगळूर, रायचूर, कारवार जिल्ह्यांत आज मॉक ड्रिलpudhari photo
Published on
Updated on

बंगळुरू / नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पाश्वर्र्भूमीवर उद्भवलेल्या नवीन आणि गुंतागुंतीच्या धोक्यांमुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 27 राज्यांतील आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील 244 जिल्ह्यांमध्ये 7 मे रोजी सुरक्षेसंदर्भात सराव (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्यातील बंगळुरू, कारवार आणि रायचूर या तीन महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.

बंगळुरू मोठी लोकसंख्या असलेले महानगर असून आयटी हब म्हणून ओळखले जाते. शहरात दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट किंवा मोठी आग लागली, तर त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी यंत्रणांची तत्काळ प्रतिक्रिया, मदत पोहोचवण्याची क्षमता आणि समन्वय तपासण्यासाठी हे ठिकाण निवडण्यात आले आहे.

कारवारजवळ असलेल्या कैगा अणुऊर्जा प्रकल्पामुळे ते क्षेत्र संवेदनशील मानले जाते. अणुऊर्जा प्रकल्प किंवा इतर धोकादायक औद्योगिक प्रकल्पांच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र नियम आणि कार्यपद्धती असतात. या भागात जर गळती, स्फोट किंवा इतर आपत्कालीन घटना घडल्या तर त्यांचा परिणाम आसपासच्या लोकसंख्येवर होऊ शकतो. म्हणूनच अशा परिस्थितीत मदतकार्य कसे राबवायचे, यंत्रणांचा प्रतिसाद किती वेळात मिळतो, याचे मूल्यांकन करण्यासाठी कारवार हे ठिकाण निवडण्यात आले आहे.

रायचूर हे ठिकाण औद्योगिक द़ृष्टिकोनातून महत्त्वाचे असून तेथे मोठे थर्मल पॉवर प्लांटस् आहेत. अशा ठिकाणी आगीची, स्फोटांची किंवा गॅस गळतीसारख्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन ही मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे.

यंत्रणांची तयारी आणि नागरिकांना आवाहन

कर्नाटकचे अग्निशमन सेवा, होम गार्डस्, नागरी संरक्षण आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक प्रशांत कुमार ठाकूर यांनी सांगितले की, या ड्रिलसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र पथके, उपकरणे, तातडीची वाहने आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी एकत्रित सराव केला जाणार आहे.राज्यातील सर्व औद्योगिक प्रकल्पांनाही त्यांच्या ऑन-साइट इमर्जन्सी प्लॅननुसार स्वतंत्र मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मॉक ड्रिलच्या दिवशी काही भागांत वाहतूककोंडीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, यंत्रणांकडून सायरन, अलार्म आणि तात्पुरत्या बंदोबस्ताची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

या मॉक ड्रिलचा उद्देश केवळ यंत्रणांची तयारी तपासणे एवढाच नाही, तर नागरिकांमध्ये आपत्तीच्या वेळेस काय करावे, कुठे जावे, कुणाशी संपर्क साधावा, याबाबत जनजागृती करणे हाही आहे. त्यामुळे नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे.

युद्धजन्य परिस्थितीत वाचवण्याचे प्रशिक्षण

या मोहिमेत महाराष्ट्रातील 16 शहरांचा समावेश असून, आण्विक प्रकल्प असणारे उरण, तारापूर आणि मुंबई ही शहरे पहिल्या टप्प्यात आहेत, तर बंगळूर आणि गोव्यामध्ये होणारा सराव द्वितीय श्रेणीमध्ये मोडतो. या सरावात भारतीय हवाईदलासोबत हॉटलाईन आणि रेडिओ प्रसारण यंत्रणांची चाचणी, नियंत्रण कक्ष व त्यांच्या पर्यायी नियंत्रण कक्षांची कार्यक्षमता तपासणेही समाविष्ट आहे.

खासदारांना सहभागाचे भाजपचे आदेश

भाजपने आपल्या सर्व खासदारांना सामान्य नागरिकांप्रमाणे या सरावात सहभागी होण्यास आणि स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व राज्यांना वरिष्ठ पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांसोबत समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे. भाजपने म्हटले आहे की, सर्व नागरिक, भाजप कार्यकर्ते, नेते, विद्यार्थी यांनी पुढे येऊन स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे... तुमचा सहभाग फार मोठा फरक घडवू शकतो. पक्षाचे खासदार व आमदार हे देशव्यापी सरावामध्ये सहभागी होणार आहेत.

गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण व होम गार्ड महासंचालनालयाच्या पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत नवीन आणि गुंतागुंतीचे धोके/आव्हाने उभी राहिली आहेत, त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नेहमीच नागरी संरक्षण सज्जतेची सर्वोच्च पातळी राखणे आवश्यक आहे. या सरावामध्ये राज्य सरकारांकडून शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, सरकारी आणि खासगी संस्थांतील कर्मचारी, रुग्णालयांचा स्टाफ, रेल्वे आणि मेट्रो अधिकारी तसेच पोलिस, निमलष्करी दल आणि सैन्य दलातील गणवेशधारी जवान यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news