

चिकोडी : मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील विविध गावे व शहरांमध्ये शाळांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी 35 लाख रूपये निधी मंजूर झाला असल्याचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले. एकसंबा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार हुक्केरी म्हणाले, स्थानिक शिक्षण संस्थांच्या प्रशासकीय विभागाकडून आलेल्या निवेदनाला प्रतिसाद देत 2025-26 सालात 35 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही विकासकामे लवकरच सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सौंदत्ती तालुक्यातील शिवानंद भारती इंचल अनुदानित संस्थेच्या शिवयोगीश्वर उच्च प्राथमिक व प्राथमिक व माध्यमिक शाळेला वर्गखोल्यांसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
बैलहोंगलमधील संगोळ्ळी रायण्णा बालिका हायस्कूलसभोवती कंपाऊंड भिंतीसाठी दहा लाख रुपये निधी पुरविण्यात आला आहे. बैलहोंगल शहरातील संत पद्मराज विद्यावर्धक संस्थेच्या अनुदानित मरडी बसवेश्वर हायस्कूलला विज्ञान प्रयोगशाळा खोली निर्मितीसाठी पुन्हा पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच बेळगाव तालुक्यातील मण्णूर येथील कलमेश्वर शिक्षण संस्थेच्या हायस्कूलला कंपाउंड भिंत व स्वच्छतागृह निर्मितीसाठी दहा लाख रुपये निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.