Belgaum News: 'त्या' कामगारांची आमदार, नगरसेवकाने घेतली जबाबदारी

दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; माती परीक्षण करणाऱ्या कामगारांना मिळणार आसरा
Belgaum News: 'त्या' कामगारांची आमदार, नगरसेवकाने घेतली जबाबदारी
Published on
Updated on

बेळगाव : ‘फ्लायओव्हरचा पाया ज्यांच्या हाती, त्यांना फूटपाथच साथी’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’मध्ये बुधवारी (दि. १२) माती परीक्षण करणाऱ्या कामगारांच्या स्थितीचा वृत्तांत प्रसिद्ध झाला. त्याची दखल घेत आमदार राजू सेट आणि नगरसेवक शंकर पाटील यांनी आपण त्या कामगारांच्या निवाऱ्याची सोय करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माती परीक्षण करण्यात येत आहे. या माती परिक्षणासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून धर्मवीर संभाजी महाराज चौक ते चन्‍नम्मा चौकपर्यंत माती परिक्षणाचे काम सुरू असून तीन कामगार हे काम करत आहेत.

ठेकेदाराने मातीचा नमुना काढून देणाऱ्या कामगारांच्या निवासाची सोय केली नाही. त्यामुळे, त्यांना कॉलेज रोडच्या पदपथावरच प्लास्टिकचा तंबू मारून राहावे लागत आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे या कामगारांना त्या तंबूत रात्र काढणे कठीण आहे. पण, त्यांच्या या त्रासाची ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतली नव्हती.

दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आमदार सेट यांनी पुढारीच्या माध्यमातून आम्हाला त्या कामगारांचे हाल समजले आहे. त्यामुळे, ठेकेदाराला आणि महापालिकेला त्या कामगारांच्या राहण्याची सोय करण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक शंकर पाटील यांनीही माती परिक्षणासाठी काम करणाऱ्या कामगारांची स्वखर्चाने सोय करणार आहे. दै. ‘पुढारी’ने हा विषय सर्वांसमोर मांडला आहे. त्यामुळे मी आभारी आहे, असे सांगितले.

कोट्यवधी रुपयांतून उड्डाणपूल साकारण्यात येणार आहे. पण, या पुलाच्या उभारणीत ज्यांचे हात लागणार आहेत, त्या कामगारांनाच वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येतेय. आमदार सेट व नगरसेवक पाटील यांनी त्या कामगारांच्या निवाऱ्यासाठी पुढाकार घेतला असला तरी ठेकेदार, जिल्हा प्रशासन अद्याप ढिम्मच असल्याने संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news