

बंगळूर : अर्थखात्याची मंजुरी मिळताच फेब्रुवारी, मार्च 2025 चे प्रलंबित गृहलक्ष्मी योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येतील, अशी माहिती महिला आणि बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. गुरुवारी (दि. 8) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, दोन महिन्यांचा हप्ता देण्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रेशन कार्डच्या आधारावर गृहलक्ष्मीचा निधी जमा करण्यात येतो. रेशन कार्ड रद्द झाल्याने काहीजणांच्या खात्यावर ‘गृहलक्ष्मी’ची रक्कम जमा झालेली नाही. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून माहिती उपलब्ध होताच रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात गृहलक्ष्मी सहकारी संघ सुरू करण्यात येणार आहे. सदस्यांनी प्रत्येक महिन्याला 200 रुपये जमा करणे आवश्यक आहे. सहा महिन्यानंतर कर्ज घेण्यासाठी संबंधित सदस्य पात्र ठरतील. माझ्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. कोणत्याही अटी न घालता कर्जपुरवठा केला जाईल. त्याचबरोबर सदस्यांना आरोग्य विमा लागू करण्यात येणार आहे. गृह खाते आणि महिला, बालविकास खात्याच्या सहकार्यातून अक्का पथक सुरू करण्यात आले आहे. सध्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली.
अक्का पथकांची नेमणूक
बस स्थानक, मंदिरे, मॉल, पार्किंगच्या ठिकाणी अक्का पथकांची नेमणूक करण्यात येईल. या पथकांकडून शाळा, महाविद्यालयातून जागृती करण्यात येणार आहे. तक्रार करणाऱ्या महिलांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहेत. समाज माध्यमांवर फसवणूक झालेल्या महिला, कौटुंबिक समस्यांपासून अडचणीत आलेल्या गृहिणी यांनादेखील तक्रार करता येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.