

बेळगाव : महापौर, उपमहापौर निवडणूक शनिवारी (दि. 15) महापालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या निवडणुकीत भाजपचीच सरशी होणार असून भाजपकडून महापौरपदासाठी मंगेश पवार आणि उपमहापौरपदासाठी सविता पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर हे निवडणूक निकाल अधिकारी असणार आहेत.
प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23 व्या महापौर, उपमहापौरपदासाठी शनिवारी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच प्रक्रिया सुरू होणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ आहे. त्यानंतर 1 वाजता निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये एकापेक्षा अधिक अर्ज आले तर हात उंचावून मतदान घेण्यात येणार आहे. तर एकेकच अर्ज आले तर बिनविरोध निवड घोषित करण्यात येणार आहे.
या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी सर्व नगरसेवकांना गेटवरच ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही, अशा सूचना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी केल्या आहेत. या निवडणुकीच्या आधी भाजपच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला होता. मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रादेशिक आयुक्तांच्या कारवाईला तात्कालिक स्थगिती आदेश मिळवला आहे. त्यामुळे सभागृहात पुन्हा भाजपचे संख्याबळ वाढले आहे. यंदा महापौरपद दक्षिण विभागाला आणि उपमहापौरपद उत्तर विभागाला देण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहतात का, हे पाहावे लागणार आहे.
भाजप : 35
काँग्रेस : 10
अपक्ष : 9
म. ए. समिती : 3
एमआयएम : 1
एकूण नगरसेवक : 58
भाजप आमदार : 2
भाजप खासदार : 1
काँग्रेस आमदार : 3
काँग्रेस खासदार : 1
एकूण मतदार : 65