Markandey Sugar Factory : ‘मार्कंडेय’ नोव्हेंबरला सुरु करणार

अविनाश पोतदार : सर्वसाधारण सभा, आर्थिक मदतीसाठी घाळी कंपनीचा पुढाकार
Markandey Sugar Factory : ‘मार्कंडेय’ नोव्हेंबरला सुरु करणार
Published on: 
Updated on: 

बेळगाव : गेली दोन वर्षे अनेक अडचणींमुळे कारखाना बंद राहिला असला तरी वाईटातूनही चांगले घडते. त्यामुळे कारखाना लीजवर न देता येत्या नोव्हेंबरपासून हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वेगाने काम सुरु आहे. यापुढे कारखाना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अविनाश पोतदार यांनी दिली.

काकतीतील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २४) कारखानास्थळावर झाली. यावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. ते म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे कारखाना बंद करावा लागला. कारखान्याची वन खात्याच्या जागेची लीज संपली होती. पण, पाठपुरावा करुन कारखान्याची खानापूर तालुक्यातील जागा वन खात्याला वर्ग केली आहे. आता कारखानास्थळाची ११३ एकर जागा कारखान्याच्या नावावर व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे काम झाले तर कारखान्याला आर्थिक अडचण येणार नाही.

आता या कारखान्याला सुधींद्र घाळी यांनी आर्थिक मदतीची ग्वाही दिली आहे. त्यांच्या मदतीने नोव्हेंबरमध्ये कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न आहे. कारखाना सुरु झाला की सर्व सोसायट्या आणि इतर संस्थांची देणी देण्यात येतील. यासाठी आम्हाला सर्वांचे सहकार्य पाहिजे. शेतकऱ्यांचा ऊस पाहिजे. कारखाना सुरु करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. व्यवस्थापकिय संचालक झुबिउल्लाह के. म्हणाले, कारखाना बंद राहिल्यामुळे दोन वर्षे कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नाहीत. आता पोतदार यांच्या पुढाकाराने एकेक समस्या दूर होत आहेत. पुन्हा वीजपुरवठा, पाणीपुरवठा करण्यात आला आहे. कामगारांचे थकीत वेतन जमा करण्यात येत आहे. २०२६ चा हंगाम साधण्यासाठी काम होत आहे, असे त्यांनी सांगितले.

सुधींद्र घाळी म्हणाले, मार्कंडेय कारखाना पुन्हा सुरु करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे. हा कारखाना शेतकऱ्यांकडेच राहावा, अशी आमची भावना आहे, असे सांगितले. माजी अध्यक्ष व संचालक आर. आय. पाटील म्हणाले, मी उपाध्यक्ष असताना कारखान्यावर २३० कोटींचे कर्ज होते. या काळात ३५ कोटी रुपयांचे जुनी देणी देण्यात आली. मी स्वतः ७० लाखांहून अधिक खर्च केला. कारखाना सुरु व्हावा, यासाठी एनसीडीसीपासून अनेक ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. यापुढे सर्व मिळून कारखाना सुरु करु, असे सांगितले. अविनाश पोतदार यांच्यावर सर्वांनी विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आगामी हंगाम साधण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष बसवंत मायाण्णाचे यांनी सांगितले. सभासद विनोद भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

संचालक सुनील अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर संचालक जोतिबा आंबोळकर, बाबुराव पिंगट, चेतक कांबळे, शिवाजी कुट्रे, बसवराज गाणगेर, वसुधा म्हाळोजी, वनिता अगसगेकर आदी होते. सभेला रावजी पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, भरत शानबाग, नीलिमा पावशे, सुभाष हुद्दार, अनिल कडोलकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news