

बेळगाव : मराठीबहुल बेळगावचे कानडीकरण करण्यासाठी प्रशासन कुठल्या थराला जाईल, याचा नेम नसतो. आता राज्योत्सवाच्या तोंडावर महापालिकेचे कानडीप्रेम उफाळून आले असून, गुरुवारी (दि. 30) शहरातील दुकानांवरच्या मराठी आणि इंग्रजी फलकांना महापालिकेच्याच कर्मचार्यांनी काळे फासण्याचा आगाऊपणा केला आहे. त्यामुळे व्यापारी आणि लोकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नामफलकांवर 60 टक्के जागेत कन्नड अक्षरे लिहिण्याची सक्ती करण्यात येत असून, त्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. उर्वरित 40 टक्के जागेत कोणत्याही भाषेतील मजकूर लिहिता येतो; पण गुरुवारी मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड येथील दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी फलकांना काळे फासण्याचा प्रताप करण्यात आला.
शहरातील काही गुंडप्रवृत्तीचे कन्नड कार्यकर्ते इतर भाषांतील फलकांना काळे फासणे, फलक फाडणे, अशी दांडगाई पोलिसांच्या उपस्थितीत करत असतात. आता अशा गुंडगिरीत महापालिकेची भर पडली आहे. फलकांना काळे फासण्याचा बेकायदा प्रकार महापालिकेने केला असून, त्याबद्दल व्यापारी आणि लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेने कन्नड भाषा व्यापक विकास कायदा, 2022 च्या तरतुदींचा वापर करून मराठी आणि इंग्रजीमध्ये फलक लावणार्या दुकानांवर कारवाई केली आहे. फलकांना काळे फासण्यात येत आहे. या प्रकरणामुळे बेळगावमधील मराठी भाषिक अल्पसंख्याकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. महापालिकेचे हे कृत्य भारतीय संविधानाच्या कलम 350 ब अंतर्गत संवैधानिक अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘किरकोळ विक्रेते संघटना विरुद्ध कर्नाटक राज्य’ या खटल्यात फलक काढण्यावर अंतरिम स्थगिती दिली आहे. फलक जबरदस्तीने काढण्यापासून रोखले आहे; पण महापालिकेने या आदेशाची पायमल्ली केली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे अल्पसंख्याक आयोगाकडे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केली आहे.
राज्योत्सवानिमित्त महापालिकेने शहरातील इंग्रजी आणि मराठी भाषेतील फलकांवर काळे फासले. या प्रकाराविरोधात म. ए. युवा समितीने केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.