बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा; आम्ही सर्वजण एकच असून सीमाभागातील मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही सहकार व नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.चंदगड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मंत्री मोहोळ रविवारी (दि. 13) सांबरा विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी भेट घेतली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यासाठी आपण लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व येथील मराठी जनतेला न्याय द्यावा, म. ए. समितीच्या नेत्यांनी मंत्री मोहोळ यांच्याकडे केली. माजी महापौर सरिता पाटील व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी सीमाप्रश्नाबाबत सविस्तर माहिती देत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपलेही सहकार्य मोलाचे असून येथील मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. त्यावर मोहोळ यांनी मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.
यावेळी विमानसेवा सुरळीत करून बेळगाव-पुणे ही विमानफेरीही सुरू करण्याची त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर विमान फेर्या पूर्ववत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगरसेवक पंढरी परब, अजित गरगट्टी, सुबोध गावडे, राजू नाईक, विश्वनाथ पाटील, अनंत चौगुले, राजू पोटे, गजानन पवार, माऊती जत्राटी, गंगान्ना तिमापूरमठ, चंदगडचे आशिष साखरे, किशोर बेल्लद, सुनील कांजरे आदी उपस्थित होते.