

बंगळूर : राज्यात अधूनमधून होणार्या पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असून जलाशयांच्या साठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अतिवृष्टीमुळे गुरुवारी (दि. 29) रात्री उशिरापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. किनारपट्टी भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळूर येथे मातीचा भूस्खलन होऊन ढिगारा कोसळून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. प्रेमा (वय 60), आर्यन (2), आरुषी (3) आणि नईमा (7) अशी मृतांची नावे आहेत.
मंगळूरजवळील मोंटेपद गावात भूस्खलन होऊन घरावर मातीचा ढिगारा कोसळला. या घटनेत प्रेमा, आर्यन आणि मुलगी आरुषी यांचा मृत्यू झाला. पहाटे 4 च्या सुमारास हा ढिगारा कोसळला. तसेच दोन मोठी झाडेही घरावर कोसळली. दुसर्या घटनेत डेरालकट्टे येथील कनाकेरे येथे घरावर मातीचा ढिगारा कोसळल्याने नईमा (वय 7 ) हिचा मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा पालकमंत्री दिनेश गुंडूराव यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे मंगळूर जिल्ह्यात भूस्खलन होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.