

बंगळूर : ज्येष्ठ काँग्रेस नेते अ. भा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाच्या तक्रारीनंतर खर्गे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी दवाखान्याला भेट देऊन खर्गे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
खर्गे यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. सततच्या प्रवासामुळे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे खर्गे यांची तब्येत बिघडली आहे. आता त्यांची तब्येत चांगली असून काही दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली.