

बंगळूर : केंद्राकडून राज्याला मिळणार्या कराच्या वाट्यामध्ये अन्याय होतो आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असताना भाजप नेते चलो धर्मस्थळ यात्रा काढत असल्याचा टोला मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी लगावला आहे.
म्हैसूर येथे रविवारी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्राकडून कराच्या हिश्श्यावरून नेहमी कर्नाटकावर अन्याय होत आहे. नव्याने तयार केलेल्या जीएसटी सुधारणांमुळे कर्नाटकला 11 हजार 950 कोटी गमवावे लागले आहेत. मात्र भाजप खासदार यावर काहीही बोलत नाहीत. आता ते धर्मस्थळ यात्रा काढून त्या मुद्द्य्चा राजकीय वापर करण्यात व्यस्त आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये दोन स्तर केल्याने दरवर्षी 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. आम्ही या सुसूत्रीकरणाचे स्वागत करतो. पण आमचे उद्दिष्ट बजेट वाचवणे आहे. त्यासाठी आठ राज्यांनी दिल्लीत चर्चा केली आहे. संपूर्ण राज्यात 2.50 लाख कोटी रुपये जमा होतील. त्यामध्ये 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान ही मोठी बाब आहे. आम्ही सिगारेट, गुटखा, पान मसाला व बेंझ कारसारख्या ऐषोरामी वस्तूवंर उप-कर लावून आम्हाला दिलासा द्यावा, असे सुचविले होते. मंत्री कृष्णा ब्यैरगौडा जीएसटी परिषदेच्या बैठकीत सहभागीही झाले होते. येत्या 3 व 4 सप्टेंबर रोजी होणार्या बैठकीत ते हा प्रस्ताव मांडणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिध्दरामय्या म्हणाले, धर्मस्थळ प्रकरणाची एसआयटी चौकशी करत आहे. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल. धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांनी स्वतः एसआयटी चौकशीचे स्वागत केले आहे. परंतु भाजपकडून राजकरण होत आहे. धर्मस्थळ प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहिजे, म्हणून एसआयटी स्थापन केली. अन्यथा प्रत्येकाच्या मनात धर्मस्थळ बद्दल नेहमीच शंका राहीली असती.
धर्मस्थळ प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि आता संशयिकत क्रमांक 1 बनलेल्या चिन्नय्याने मानवी कवटी मंगळूर न्यायालयात सादर करण्यापूर्वी दिल्लीला नेली होती, हे या आंदोलनाचे समर्थक आणि माहिती हक्क कार्यकर्ते जयंत टी. यांनीही कबूल केले आहे. तसेच कवटीसोबत आपणही गेलो होतो, हेही मान्य केले होते. तक्रारदार चिन्नय्या ती कवटी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणार होतो, म्हणून आपण सोबत गेलो होतो, असेही जयंत यांनी म्हटले आहे.
कवटी नेमकी कुठून आली, हा उलगडा झाला नसला तरी चिन्नय्या व इतरांनी ती कवटी बंगळूरहून दिल्लीला नेल्याचे म्हटलेे आहे. रविवारी (ता.31) जयंत यांनी बेळथंगडी येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले की, चिन्नय्यासोबत गिरीश मट्टेन्नावर व सुजाता भट याही होत्या. बंगळूर ते दिल्ली व तेथून मंगळूरला येताना मी आणि चिन्नय्या एकत्र होतो. शिवाय गेल्या एप्रिल किंवा मे महिन्यात त्याला माझ्या घरात आश्रय दिला होता. कवटीसोबत काही प्लास्टिक वस्तूही मी पाहिल्या होत्या. सुजाता भट व चिन्नय्या यांना मदत केल्याची मला भीती वाटत नाही. सत्यासाठी मी तुरुंगात जाण्यास तयार आहे.