

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा आणि साक्षीपुरावे सादर करून सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी विनंती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार त्यांच्याकडे शनिवारी (दि.26 ) केली.
सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समिती व तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करून लवकर बैठक घ्यावी. दाव्यासंदर्भात वकिलांची नेमणूक समन्वयकांची नेमणूक सीमा कक्षातील कर्मचार्यांची नेमणूक याबाबत लवकर निर्णय व्हावे. याबाबत लवकरच बैठक बोलवण्याची ग्वाही पवार यांनी शिष्टमंडळाला दिली.
समितीने मागणी केलेल्या गोष्टींपैकी समन्वय मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली. समन्वय मंत्र्यांनी वेळोवेळी सीमा भागात येऊन येथील मराठी भाषिकांशी चर्चा करावी, अशी ही विनंती करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे सेक्रेटरी एम. जी. पाटील, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, उपाध्यक्ष गोपाळ पाटील व महादेव मंगनाकर उपस्थित होते.