

बेळगाव : प्रत्येक विषयात नियम मोडून बोलणारे रवी धोत्रे बोलत असतात. त्यांना तुम्ही पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे का, अशा शब्दांत म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौरांकडे तक्रार करताच म. ए. समितीचे लोक आम्हाला काय विचारताय, त्यांना काय अधिकार, असे असंबंध बोलणार्या रवी धोत्रे यांच्याविरोधात विरोधी गटाने एकच आवाज चढविला. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.
महापालिकेत बुधवारी (दि. 12) महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटात अनेकदा वादावादीचे प्रसंग उद्भवले. सरकारनियुक्त सदस्य रमेश सोनटक्की यांना महापौरांनी रुलिंग दिल्यानंतर बोलण्यास नगरसेवक रवी धोत्रे यांनी मनाई केली. त्यावर हा नियम सर्वांनी पाळावा, अशी अपेक्षा विरोधी गटातील नगरसेवकांनी व्यक्त केली. महापौरांनी बोलण्यास सांगितल्याशिवाय कोणी बोलू नये, असे सांगितले.
त्यानंतरही एका विषयात धोत्रे बोलण्यास सुरवात केली. त्यामुळे विरोधी गटाने जोरदार आक्षेप घेतला. यावेळी म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी, नगरसेवक धोत्रे प्रत्येक विषयात बोलत असतात, दुसर्यांना बोलायला देत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना बोलण्याची पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे का, असा थेट सवाल केला. त्यामुळे खळवळून उठलेल्या धोत्रे यांनी समितीचे लोक आम्हाला कसे बोलू शकतात, असे सांगत सत्ताधारी गटनेत्यांकडे तक्रार करू लागले.
रवी साळुंखे यांच्या मदतीला समिती नगरसेवक शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांच्यासह विरोधी गटातील नगरसेवकही उभे राहिले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महापौर पवार यांनी हस्तक्षेप करत कोणीही विषयांतर न करता सुरळीत काम करण्यास मदत करावी, असे सांगितले.
सभा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली यांनी आम्ही ठराव केला तरी विरोधी गट अधिकार्यांच्या बाजूने उभे राहतो, अशी टीका केली. तर सभागृहात कोणी गोंधळ घालत असेल तर त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे, असे महापौरांना सांगून अधिकारांची जाणीव करून देऊ लागले. त्यावर विरोधी गटाने आक्षेप घेतल्यानंतर नियम सत्ताधारी गटासाठीही आहेत, अशी सारवासारव त्यांनी केली.