डॉल्बीचा दणदणाट देखाव्यांना मारक

शिवजयंती मिरवणुकीत वापर टाळण्याची मागणी : मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज
डॉल्बीचा दणदणाट देखाव्यांना मारक
File Photo
Published on
Updated on

बेळगाव : शिवजयंती उत्सव अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपल्याने शिवप्रेमींची उत्सुकता शिगेला पोचली आहे. चित्ररथ मिरवणुकीवेळी सादर करण्यात येणार्‍या देखाव्यांची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. असे असताना मिरवणुकीत वापरण्यात येणार्‍या डॉल्बीचा परिणाम चित्ररथावरील देखाव्यांवर पडत असल्याचा मतप्रवाह आहे. यातून डॉल्बीमुक्त शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्याची मागणी जोर धरत आहे.

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंगळवारी (दि. 15) झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी डॉल्बीविरोधात मते व्यक्त केली. शिवजयंती उत्सव मंडळांनी डॉल्बीला फाटा द्यावा, अशी मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. यामुळे डॉल्बीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डॉल्बीच्या दणदणाटात चित्ररथ मिरवणुकीवर सादर करण्यात येणार्‍या शिवकालीन देखाव्यांचा आस्वाद शिवप्रेमींना घेता येत नसल्याची मते मांडण्यात आली.

बेळगाव शहर शिवप्रेमी म्हणून ओळखले जाते. येथील शिवजयंती उत्सवाला 106 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. शिवजयंती दरम्यान सादर करण्यात येणारे देखावे प्रमुख आकर्षण असतात. देखावे पाहण्यासाठी कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा येथून अनेक रसिक येत असतात. परंतु, डॉल्बीच्या आवाजात चित्ररथावर सादर करण्यात येणार्‍या देखाव्यांचा आस्वाद शिवप्रेमींना पूर्णपणे घेता येत नाही. संवाद ऐकता येत नाहीत. यामुळे डॉल्बीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.

शिवजयंती मिरवणुकीत किमान 50 ते 60 चित्ररथ सहभागी होत असतात. प्रत्येक गल्लीकडून चित्ररथ साकारण्यात येतो. एकेका देखाव्यात 25 ते 150 पर्यंत पात्रे सहभागी असतात. त्यांना आपली कला सादर करण्यास योग्य जागा मिळत नाही. अनेकदा रस्त्यावरच देखावे सादर करावे लागतात. यातून रहदारी कोंडी निर्माण होते. चेंगराचेंगरीचे प्रसंग घडतात. हे टाळणे आवश्यक आहे.

डॉल्बी आणि ढोल पथकांचा वापर अडचणीचा ठरत आहे. डॉल्बीचा आवाज मोठा असतो. त्याचबरोबर ढोल पथकांचाही आवाज प्रचंड असतो. त्यामुळे, देखाव्यांतील संभाषण प्रेक्षकांना ऐकू जात नाही. यातून कलाकारांची मेहनत वाया जाते. यामुळे मध्यवर्ती शिवजयंती मंडळाने यासाठी पुढाकार घेत जागृती करावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news