Lokayukta raids: लोकायुक्तांचे 30हून अधिक ठिकाणी छापे

कोट्यवधींची बेकायदा मालमत्ता उघडकीस : महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत
Lokayukta raids
Lokayukta raidsFile Photo
Published on
Updated on

बंगळूर : उत्पन्न स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या संशयावरुन लोकायुक्तांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने व आस्थापनांवर गुरुवारी (दि. 5) छापे टाकले. या छाप्यांतून विविध विभागात काम करणाऱ्या सात अधिकाऱ्यांकडे बेकायदेशीर संपत्ती आढळून आली आहे. हासन, मंड्या, बंगळूर आणि धारवाडसह 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यातून कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे.

काही लोकांच्या बेकायदेशीर संपत्तीची कागदपत्रे पाहून लोकायुक्त अधिकारी स्वतःच हैराण झाले. हासन शहरातील रक्षणपुरममधील महापालिकेचे अधिकारी सत्यनारायण यांच्या मालमत्तांवर लोकायुक्तांनी छापा टाकला. मंड्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता सतीश यांचे कार्यालय आणि बांदीगौडा लेआउटमधील त्यांचे निवासस्थान अशा एकूण चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. कर्नाटक रस्ते विकास महामंडळाचे (केआरडीसीएल) मुख्य अभियंता वसंत वालप्पा नायक यांच्या बागलकोटमधील निवासस्थानी आणि त्यांच्या भावाच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी कागदपत्रे आणि बेकायदेशीर मालमत्ता असल्याचे दिसून आले आहे. लोकायुक्त अधिकारी घरासमोर उभे राहिले तरीही नायक कुटुंबाने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणून दरवाजा उघडला.

येलहंका येथील शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सीईओ आर. शशिधर यांच्या घरावर तसेच हेब्बाळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे साहाय्यक प्रा. एच. सी. इंद्रेश यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. धारवाडमध्ये हेस्कॉमचे उपविद्युत निरीक्षक वीरेश हिरेमठ, हासनमध्ये मागासवर्गीय व अल्पसंख्याक विभागाचे तालुका कल्याण अधिकारी एम. के. सुरकोड, महापालिकेचे एईई एम. सी. सत्यनारायण, कृष्णा भाग्य जल महामंडळाचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पी., आसिफ इक्बाल यांच्यावरही लोकायुक्तांनी छापा टाकला.

विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील कनिष्ठ अभियंता प्रकाश पी. जी. (गोदाबंदी) यांच्यावरही छापा टाकण्यात आला. प्रकाश यांच्या इंडी कार्यालय आणि निवासस्थानाव्यतिरिक्त, बंगळूरातील महादेवपुर येथील त्यांच्या घरावर आणि बिदरमधील हुमानाबाद येथील त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या शाळेवरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. छापा टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास अधिकारी करत आहेत.

जीपवर चढून घरात प्रवेश

लोकायुक्त डीवायएसपी सुरेश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हासन एएई सत्यनारायण यांच्या रवींद्रनगरमधील निवासस्थानी छापा टाकला असता त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. सुमारे अर्धा तास दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हुशारी दाखवली. त्यांनी पोलिसांची जीप घराच्या भिंतीला लावली. त्यावर चढून पहिल्या मजल्यावरुन घरात प्रवेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news