

बेळगाव ः अंगणवाडी सहाय्यिकेच्या अंतर्गत बदलीसाठी लाच घेताना समाजकल्याण खात्यातील दोघेजण लोकायुक्त जाळ्यात सापडले. कार्यालयीन अधीक्षक अब्दुल वली व संगणक ऑपरेटर सौम्या बडीगेर अशी त्यांची नावे आहेत. नेहरूनगर येथील समाजकल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.
हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी सहायिका शकुंतला कांबळे यांनी अंतर्गत बदलीसाठी जिल्हा समाजकल्याण खात्याकडे अर्ज केला होता. परंतु, या बदलीसाठी येथील कार्यालयीन अधीक्षक अब्दुल वली याच्याकडून 30 हजारांची मागणी होत होती. त्यामुळे श्रीमती कांबळे यांनी लोकायुक्त खात्याकडे तक्रार केली होती. तक्रार नोंदवून घेत लोकायुक्त खात्याने सापळा रचला. 30 पैकी 15 हजारांची पहिल्या टप्प्यातील रक्कम देण्याचे आश्वासन श्रीमती कांबळे यांनी दिले होते.
त्यानुसार गुरूवारी सकाळी त्या रक्कम घेऊन समाज कल्याण खात्याच्या कार्यालयात गेल्या. तिथे संगणक ऑपरेटर सौम्या बडीगेर या लाचेची रक्कम स्ीवकारताना रंगेहाथ सापडल्या. ही लाच त्यांनी वली यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे सांगितल्याने त्यांनाही संशयित म्हणून ताब्यात घेत दोघांचीही चौकशी सुरू केली. लोकायुक्तचे पोलीस निरीक्षक रवी धर्मट्टी, निरंजन पाटील यांच्यासह अन्य अधिकार्यांनी ही कारवाई केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
आपल्यावर लोकायुक्त छापा पडल्याचे लक्षात येताच संगणक ऑपरेटर सौम्या बडिगेर या पुरत्या गोंधळून गेल्या. त्या अत्यवस्थ बनल्याने कार्यालयातच डॉक्टरांना बोलावून घेतले. त्यांना आराम वाटू लागल्यानंतर त्यांची चौकशी सुरू केली.