

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून रस्ते, गटारी, पूल, धार्मिक स्थळे आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत उत्तम सुविधा पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे. येत्या काळात आणखी अनेक विकासकामे राबवून बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला राज्यातील आदर्श मतदारसंघ बनविण्याचा संकल्प आहे, असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.
हेब्बाळकर यांनी शनिवारी विविध गावांमध्ये रस्ते, गटारी, पूल तसेच मंदिरांच्या बांधकामांचे भूमिपूजन केले. सर्वप्रथम बडस गाव ते बिदरगड्डी या रस्त्याचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. 1.12 कोटी रुपयांच्या खर्चातून हा रस्ता उभारला जाणार आहे. त्यानंतर भेंडिगेरी गावात सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या रस्ता आणि गटार बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. चांगले रस्ते आणि सक्षम जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा निघले, असे त्यांनी सांगितले.
अरळीकट्टी गावात सुमारे 1 कोटी रुपयांच्या खर्चातून नव्याने उभारण्यात येणाऱ्या बसवेश्वर मंदिराच्या इमारत बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्यातील 20 लाख रुपयांचा धनादेश हेब्बाळकर यांनी सुपूर्द केला. गावातील तोंटदार्य वीरक्त मठाचे शिवमूर्ती अज्जण्णावर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. हे मंदिर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठीही महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असे त्या म्हणाल्या. उद्घाटन कार्यक्रमांमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य जनता, माता-भगिनी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.