

बेळगाव : स्वातंत्र्य लढा, सीमालढा, गोवा मुक्ती आंदोलन, कामगार, श्रमिकांची चळवळ अशा विविध चळवळींचा महत्त्वाचा साक्षीदार आणि सक्रिय नेते म्हणजे कॉ. कृष्णा मेणसे. चळवळ आणि विचार यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. खांद्यावर कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा घेत आयुष्यभर श्रमिक, कामगारांच्या चळवळीत ते अग्रेसर राहिले. सीमालढ्यात बिनीचे सरदार म्हणून वावरले. 1955 साली मुंबईत संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिले आंदोलन झाले. त्या आंदोलनात बेळगावातून कृष्णा मेणसे सहभागी झाले होते. त्याशिवाय सीमालढ्यातील ते पहिले आंदोलक होते.
त्यांचा जन्म बेळगाव येथील शेतकरी कुटुंबात 9 फेब्रुवारी 1928 रोजी झाला. घरी वारकरी परंपरा असल्यामुळे वारकरी संप्रदायाचे संस्कार बालवयात झाले. शालेय शिक्षण बेळगावातच झाले. माध्यमिक शिक्षण प्रथम मराठा मंडळ, त्यानंतर जी. ए. हायस्कूल येथे झाले. त्यांनी राष्ट्र सेवादलाच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. याच काळात बेळगावात भूमिगत राहण्यासाठी येणार्या प्रतिसरकार चळवळीतील अनेकांना आश्रय देण्याचा काम केले. या काळात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, बर्डे गुरुजी, जी. डी. बापू लाड यांचा परिचय झाला. महात्मा गांधींनी दिलेल्या आदेशाला प्रतिसाद देत 1946 मध्ये शिक्षणाचा त्याग करून थेट महात्मा गांधींच्या आश्रमात ते दाखल झाले. तेथेच आचार्य विनोबा भावे यांची भेट झाली. पुढे महात्माजींच्या आणि विनोबाजींच्या सल्ल्यानुसार घरी परतले व शिक्षणास पुन्हा प्रारंभ केला.
कुस्ती आणि वक्तृत्व ही दोन क्षेत्रे त्या काळात त्यांनी गाजवली. महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यात काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आल्यामुळे व ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करण्यास काँग्रेस नेते टाळाटाळ करताहेत हे पाहून त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यांनी आदिवासी बेरड समाजाला संघटित करण्याचे काम केले. बेळगाव परिसरातील वेश्यांची संघटना बांधली. महात्मा फुलेंचा सत्यशोधक विचार बहुजन समाजात रुजविण्याचे काम त्यांनी केले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी दि. 10 ऑक्टोबर 1955 रोजी मुंबईत झालेल्या सत्याग्रहात बेळगाव परिसराचे प्रतिनिधीत्व करून स्वतःस अटक करवून घेतली. त्यांना सत्याग्रह केल्याबद्दल आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. 16 जानेवारी 1956 रोजी भाषावार प्रांतरचना केंद्र सरकारने जाहीर केली व सीमाभाग कर्नाटकात घातला. त्याची संतप्त प्रतिक्रिया बेळगावात उमटली. 17 जानेवारी 1956 साली आंदोलनास सुरुवात झाली. बेळगावात गोळीबार होऊन चारजणांना हौतात्म्य लाभले. या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले. यामुळे त्यांना केंद्र सरकारने स्थानबद्ध करून अकरा महिने तुरुंगात ठेवले. या कालावधीत त्यांना देशातील बेळगाव, नाशिक, मुंबई, दिल्ली येथील सात तुरुंगात ठेवण्यात आले. सीमा आंदोलनाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेळगाव परिसरातील शंभर गावांतून साराबंदी आंदोलन करण्यात आले. येळ्ळूर येथे भाई उद्धवराव पाटील यांच्यासोबत सत्याग्रह केला. त्यावेळी त्यांना पोलिसांनी मारहाण केली व तुरुंगात ठेवले. सन 1972 पर्यंत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जेवढी आंदोलने सीमाभागात झाली त्या सर्व आंदोलनातून सहभाग घेतला.
गोवा मुक्ती आंदोलनाचे बेळगाव हे केंद्र झाले. या आंदोलनातही त्यांनी अग्रभागी राहून कार्य केले. देशभरातून बेळगावात येणार्या सत्याग्रहींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, गोवा सरहद्दीवर मारहाणीत जखमी झालेल्या सत्याग्रहींना बेळगावात आणून इस्पितळात दाखल करणे, त्यांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी व्यवस्था करणे, गोळीबारात मरण पावलेल्या हुतात्म्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवणे ही कामे त्यांनी केली. बेळगावात राहून गोवा मुक्तीसाठी कार्य करणार्या गोबन पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आश्रय दिला.
असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर काम केले. यामध्ये प्रामुख्याने हॉटेल कामगार, विणकर कामगार, रिक्षावाले, हमाल, औद्योगिक कामगार यांचा समावेश होतो. देशभरात असलेल्या अॅल्युमिनियम कंपन्यांच्या कामगारांची मध्यवर्ती संघटना स्थापन करण्यात योगदान दिले. सिमेंट उद्योगातील कामगारांना न्याय मिळावा म्हणून कर्नाटकातील सिमेट कामगारांचे फेडरेशन तयार केले. कर्नाटकातील विणकर कामगारांसाठी वेतन श्रेणी तयार करण्याचे काम शासनाने त्यांच्यावर सोपविले होते, ते त्यांनी पार पाडले. खाण उद्योगात काम करणार्या कामगारांना न्याय मिळवून दिला.
कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य केले. त्याबद्दल त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अनेकवेळा तुरुंगवास सहन करावा लागला. बेळगाव जिल्ह्याबरोबरच त्यांनी विजापूर, गुलबर्गा, रायचूर आणि बिदर या जिल्ह्यात पक्षाचे कार्य वाढविले. पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीचे चिटणीस तसेच राष्ट्रीय समितीचे सभासद महणून त्यांनी दीर्घकाळ काम केले.
त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू साहित्याचे वाचन होतेे. 1959 साली साहित्याला वाहिलेले ‘हेमंत’ हे मासिक सुरू केले. हे मासिक तीन वर्षे चालले. 1962 साली त्यांना केंद्र सरकारने अटक करून तुरुंगात ठेवले. त्यामुळे या मासिकाच्या प्रकाशनात खंड पडला. पुढे सीमा चळवळीत आपली भूमिका मांडण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 साली ‘साम्यवादी’ हे साप्ताहिक सुरू केले. जे आजही सुरू आहे. याबरोबरच विविध वृत्तपत्रात त्यांनी शेकडो लेख लिहिले.
पक्षकार्य आणि कामगार चळवळ या निमित्ताने देशभरात प्रवास केला. 1976 साली तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मास्को येथे दहा महिने वास्तव्य केले. 1997 साली जागतिक मराठी परिषदेच्या इस्त्राईल येथे झालेल्या अधिवेशनात भाग घेतला. 1975 मध्ये अन्नपूर्णा महिला मंडळ, मुंबई या संस्थेची स्थापना करण्यात सहभाग घेतला. 1 मे 1988 रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते त्यांचा षष्टब्दीनिमित्त गौरव करून जनतेने 1 लाख 30 हजार रुपयांची थैली अर्पण केली. ती त्यांनी प्रबोधन कार्यासाठी वापरा असे सांगून परत केली. 16 ऑगस्ट 2003 साली त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी कॉ. ए. बी. बर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात त्यांना जनतेने जी रक्कम दिली ती त्यांनी पुन्हा प्रबोधन कार्यासाठी परत दिली.
असा आहे गोवा, गुरुवर्य शामराव देसाई चरित्र, गोठलेली धरती पेटलेली मने, अविस्मरणीय वीरगाथा अनुवाद, परिक्रमा, निपाणी येथील शेतकर्यांचा लढा, दादा पुरव स्मृतिग्रंथ (संपादन), कॉ. एस. एस. मिरजकर, कॉ. नाना पाटील, इराक अमेरिका युद्ध, हो-चि-मिन्ह, अशा तोडल्या बेड्या, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर - एक चिंतन, स्वातंत्र्य आंदोलन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी, राणी कित्तूर चन्नम्मा, असा घडलो असा लढलो, बंधू भगिनींनो
* क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार- 20042
* संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने गौरव- 2007
* सार्वजनिक वाचनालय, बेळगावच्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार- 2009
* सरस्वती वाचनालय, बेळगावतर्फे देण्यात येणारा बेळगाव भूषण पुरस्कार- 2011