

विठ्ठल कोळेकर
कोगनोळी : भारत देश हिंदू राष्ट्र बनेल. हिंदू धर्माची स्थापना जगातील अनेक देशांत करण्यात येईल. शिवाजी महाराज कुणाच्यातरी पोटी पुन्हा जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल, भगवा झेंडा सभेत मिरवेल. दीड महिन्याचे धान्य येईल, ज्याच्याजवळ धान्य तो शहाणा होईल. मेंढीबाई पालखीतून मिरवेल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. धनगराचा बाळ अस्वलाला मेंढी म्हणून मिठी मारेल, मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. रसाच्या कांड्यानं आणि दुधाच्या भांड्यांना आंदोलन पेटतील, अशी भाकणूक कृष्णात डोणे महाराज (वाघापूरकर) यांनी केली.
बिरदेव यात्रेनिमित्त शनिवारी रात्री ढोलवादन सबिना गजी नृत्य झाल्यानंतर रविवारी पहाटेच्या निरव शांततेत पार पडलेल्या भाकणुकीमध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, कृषी क्षेत्राविषयी अनेक गोष्टींचा आढावा घेण्यात आला. भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे 52 मिनिटे ही भाकणूक झाली.
डोणे महाराज म्हणाले, माणसाला बुद्धी जास्त व आयुष्य कमी होईल. पाण्याचा कप विकत मिळेल. माणसाला 18 प्रकारचा आजार होईल. कोरोनापेक्षा महाभयानक महामारी येईल. डॉक्टर लोक हात टेकतील. विज्ञानाची प्रगती मनुष्याला घातक ठरेल. राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजा व प्रजा यांच्यामध्ये झगडे होतील. पक्षापक्षांत गट पडून झंजावात लागेल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. कर्नाटक राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल. सीमाभागातील राजकारण ढवळून निघेल.
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये छुपे युद्ध होईल. काश्मीर खोऱ्यात मोठी धुमश्चक्री होईल. माणसाला माणूस खाऊन टाकेल. दागिना, पैसा मनुष्याला घातक ठरेल. लाकडाची डोरली येतील. रेल्वे, मोटार व विमान यांचे मोठे अपघात होतील, भावाला बहीण व सासऱ्याला सून ओळखणार नाही. नात्याला कलंक लागेल. बारा वर्षांची मुलगी आई होईल. चंद्र-सूर्याची आकस्मिक मोठी टक्कर होईल. साताऱ्याच्या गादीवर फुल पडतील. गुंडांचे राज येईल. महागाईचा भस्मासुर सुटेल.
भारत देशात नवनवीन कायदे अस्तित्वात येतील. समान नागरी कायदा येईल. उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल. नदीचा माळ व माळाची नदी होईल. ठीकठिकाणी जलप्रलय होईल. जलप्रलयाने मोठी हानी होईल. जंगलातील पक्षी गावात येतील. गावातील मनुष्य जंगलात जाईल. हिंदू धर्म पवित्र राहील.